वीज कोसळून शेतकरी ठार, पवनी तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:04 PM2022-06-30T17:04:16+5:302022-06-30T17:24:36+5:30
आसपासच्या शेतकऱ्यांनी त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भंडारा : शेतात काम करताना वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कवडसी येथे गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. शिवसज्जन देवराम बोरकर (५१) रा. गयाडोंगरी, ता. पवनी असे मृताचे नाव आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती कवडसी शिवारात आहे. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. दुपारी विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास वीज त्यांच्या शेतात कोसळली त्यात शिवसज्जन गंभीर जखमी झाले.
शेतशिवारात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांच्या नावावर अडीच एकर शेती असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्यांच्या मागे पत्नी रंजना, मुलगा संदेश, मुलगी श्रेया आणि रिद्धिका असा परिवार आहे. तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहाडी तालुक्यात वीज कोसळून सात जण जखमी
मोहाडी तालुक्यातील भिकारखेडा येथे बुधवारी दुपारच्या रोहित्रावर वीज कोसळल्याने पानटपरीवर बसलेले सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली होती. पावसापासून बचावासाठी काही जणांनी गावालगतच्या पानटपरीचा आश्रय घेतला. त्यावेळी पानटपरीजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर अचानक वीज कोसळली. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना माेहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.