लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसातील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 12:39 PM2022-09-30T12:39:57+5:302022-09-30T12:51:32+5:30
सीटी-१ वाघाची १३ वी शिकार
दयाल भोवते
लाखांदूर(भंडारा) : आठवडाभरापूर्वी इंदोरा जंगलात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाने शुक्रवारी पुन्हा एका जणाचा बळी घेतला. शेतातील पिकाची पाहणी कराण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात घडली. या वाघाची ही १३ वी शिकार असून तालुक्यातील चौथी घटना होय.
तेजराम बकाराम कार (४५) रा. कन्हाळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते गावातील मनोज शालिक प्रधान (३०) याच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. हा थरार पाहून मनोजने प्रचंड आरडा ओरड केली. घटनेची माहिती मोबाईलवरून गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई कन्हाळगावकडे रवाना झाले. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
लाखांदूर तालुक्यातील चौथी घटना
लाखांदूर तालुक्यात वर्षभारात. सीटी-१ वाघाने चौघांचा बळी घेतला. त्यामध्ये २७ जानेवारी रोजी दहेगाव जंगलात सरपण आङ्यासाठी गेलेला लाखांदूर येथील प्रमोद चौधरी (५४), ४ एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात मोहफूल गोळा करण्यासाठी गेलेला जयपाल कुंभरे (४०), आठवडाभरापूर्वी २१ सप्टेंबर रोजी विनय खंगन मंडल (४५) रा. अरुणनगर आणि शुक्रवारी तेजराम कार या शेतकऱ्या ठार केले. या वाघाने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या ४ जिल्ह्यात १३ जणांचा बळी घेतला आहे.