शेतकऱ्याने केले कृषी केंद्र चालकाचे स्टिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:03+5:302021-09-04T04:42:03+5:30
तुमसर तालुक्यातील एक शेतकरी मेसर्स पोपटानी एजन्सी तुमसर येथे युरिया खत खरेदीसाठी गेला. परंतु, विक्रेता युरियाच्या बॅगची वाढीव किंमत ...
तुमसर तालुक्यातील एक शेतकरी मेसर्स पोपटानी एजन्सी तुमसर येथे युरिया खत खरेदीसाठी गेला. परंतु, विक्रेता युरियाच्या बॅगची वाढीव किंमत व त्यासोबत लिकिंग घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही, असे सांगत होता. त्यावेळी शेतकऱ्याला युरियाची खूप आवश्यकता असल्यामुळे त्यांनी जादा दराने युरिया खरेदी केला. परंतु नंतर कृषी विक्रेत्यावर कारवाई होण्यासाठी शेतकऱ्याने चक्क त्या दुकानात जाऊन व्हिडीओ तयार केला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला.
विक्रेत्याने जाणीवपुर्वक युरिया खताची जादा दराने विक्री करण्याचे व त्यासोबत लिंकिंग करण्याचे प्रयोजन ठेवून खताचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्याला युरिया खताचे वाढीव दर सांगितले. विक्रेता हा युरिया खताची विक्री जादा दराने करून त्यासोबत लिंकिंग करून खत विक्री करीत असल्याचे उघडकीस आलेले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोपटानी एजन्सी तुमसर यांचा परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये विक्रेता प्रतिनिधी व शेतकरी यांचे झालेले संभाषण रेकाॅर्ड झालेले असून मेसर्स पोपटानी एजन्सी तुमसर हा खत विक्रेता युरियाची प्रती बॅग ३०० रुपये व त्यासोबत लिंकिंग मटेरियल १०० रुपये असे एकूण ४०० रुपयांची मागणी करीत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना युरिया खत किंवा कोणतेही रासायनिक खत खरेदी करीत असताना कोणताही खत विक्रेता जादा दराने विक्री किंवा लिंकिंगबाबत सक्ती करीत असेल, तर याची तात्काळ माहिती जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी किंवा संबंधीत तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात यावी. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर (९०२२५४१६५२), मोहीम अधिकारी जिल्हा परिषद विकास चौधरी (९६३७६६१५८७), उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा मिलिंद लाड (९८९०४६०२३४), उपविभागीय कृषी अधिकारी साकोली पी. पी. गिदमारे (९४०५९८७२५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.