पावसाने फिरविली पाठ शेतकरी झाला चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:45+5:30
सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी रोवणी करुन २० दिवस झाले पण पाऊस नसल्याने त्यांची सुध्दा रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बुज. : तिरोडा तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाचे कुठलेच साधन त्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी रोवणी करुन २० दिवस झाले पण पाऊस नसल्याने त्यांची सुध्दा रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहे.
यावर्षी शेतकरी व शेतमजूर कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाला आहे. तीन महिने हाताला काम नाही. यात पावसाळा लागताच शेतीच्या कामाकडे शेतकरी वळला. कर्ज काढून शेतीसाठी बियाणे खरेदी करुन पेरणी केली. धानाची रोपे आणि धानाची रोवणी करावी अशातच पावसाने दडी मारली.
आठ ते दहा दिवसांपासून परिसरात पाऊस झाला नाही. त्यात धानाचे पऱ्हे सुद्धा वाळले असून कचऱ्याचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी जवळच्या शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सोईमुळे परे लावले आणि आजूबाजूचे शेत पडीक आहेत. शेतकरी आकाशाकडे दमदार पाऊस होईल आशेने दररोज आकाशाकडे नजर लावून असतो. मात्र दररोज त्याच्या पदरी निराशाच येत आहे.
कुठे गरज नसताना दिले जात आहे पाणी
खैरबंधा जलाशयाला लागून असलेल्या गावात शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाण्याची गंगा वाहत आहे. ज्यांची रोवणी झाली त्यांना पाण्याची गरज नसताना सुद्धा पाणी दिल्या जात आहे. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाणी अजूनपर्यंत मिळाले नाही. सोनेगाव, सेजगाव, बिबीटोला, नहरटोला, डब्बेटोला, दवनीवाडा, देऊटोला, झालूटोला, कारुटोला याच भागात पाणी दिल्या जात आहे. मात्र अर्जुनी, करटी, इंदोरा बुज., परसवाडा या कालव्याला अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. खैरबंधा जलाशयाचे मुख्य अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेऊन रोवणीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. जुलै महिना संपत आला असून ऑगस्ट महिन्याला सुरूवात होणार आहे. पण अद्यापही ५० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खैरबंधा जलाशयाचे पाणी केव्हा मिळणार
१३ जुलैला धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातून खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात आले. खैरबंधा जलाशयातून शेतकºयांना रोवणी लावण्यासाठी पाणी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जलाशयाच्या शेवटच्या टोकावरील इंदोरा बुजरुक, करटी बुज.,करटी खुर्द, बिहिरीया, बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा, पिपरीया, गोंड मोहाळी, किंडगीपार या गावातील कालव्यात अद्यापही पाणी पोहचले नाही.