उपोषणकर्ते शेतकरी रुग्णालयात दाखल
By admin | Published: August 20, 2016 12:18 AM2016-08-20T00:18:08+5:302016-08-20T00:18:08+5:30
सोळा तास भारनियमाच्या विरोधात विजवितरण कार्यालयासमोर साकोली येथे शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे.
उपोषण सुरुच : एकही अधिकारी वा लोकप्रतिनिधी भेट दिली नाही
साकोली : सोळा तास भारनियमाच्या विरोधात विजवितरण कार्यालयासमोर साकोली येथे शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असुन दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले असली या उपोषणमंडपाला एकाही अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधींनी साधी भेटही दिली नाही.
दरम्यान अंताराम खोटेले (७३) रा. कुंभली व प्रकाश शिवणकर (५२) रा. पळसगाव अशी रुग्णालयात दाखल केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. या दरम्यान या शेतकऱ्यांनी उर्जामंत्री, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बाळा काशिवार, विज वितरण कंपनीचे अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भारनियमन बंद करण्याची मागणी केली. मात्र यावर तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी चक्क विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरच आधी धरणे आंदोलन व आता आमरण उपोषणाला सुरवात केली. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. या आंदोलनात अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरिभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, रामदास कापगते, बाबुराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे, यशवंत ब्राम्हणकर, मारोती कापगते या शेतकऱ्यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
शासनाची काढणार अंत्ययात्रा
चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाचे व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी उद्या २० ला ११ वाजता शेतकरी विरोधी शासनाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने अविनाश ब्राम्हणकर यांनी केले आहे.
अंत्ययात्रा मोर्च्याची
उद्या दि. २० ला निघणाऱ्या अंत्ययात्रा मोर्च्यासाठी लागणारी तिरडी, वाजा व इतर साहित्याची आजच तयारी करण्यात आली असून आज विज कार्यालयासमोर दिवसभर वाजा वाजवुन आंदोलन सुरु होता.
आंदोलनात शेतकऱ्यांची गर्दी
साकोली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांची अफाट गर्दी असुन दररोज हजारो शेतकरी या उपोषण मंडपाला भेट देतात व सायंकाळी परत गावाला जातात.