कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित
By admin | Published: September 13, 2015 12:33 AM2015-09-13T00:33:59+5:302015-09-13T00:33:59+5:30
तालुक्यात ऊन्ह वाढत असल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परतीचा पाऊस येईल की नाही याची शेतकरी वाट पाहत आहे.
पिकांवर किडीचा प्रादुर्भाव : औषधी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची लूट
साकोली : तालुक्यात ऊन्ह वाढत असल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परतीचा पाऊस येईल की नाही याची शेतकरी वाट पाहत आहे. पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याची चाहुल लागत असतानाच वाढत्या उन्हामुळे शेतातील धानपीक माना खाली टाकत असल्याचे चित्र असून जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत.
पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकरी पिकावर फवारणी करीत आहे. मात्र कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित असल्यामुळे किटकनाशक विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकासंदर्भात योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येक तालुक्यात कृषी कार्यालय आहे. या अंतर्गत कृषी सहाय्यक कृषीमित्र अनेक पदे निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना विविध पिकासंदर्भात खत किटकनाशके, पिकावर होणारे विविध आजाराबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी कृषी केंद्र मालकच शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून औषधाची विक्री करीत आहेत.
येथील शेतकरी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून वंचित असल्याचे दरवर्षी धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पिकावरील रोगाचा नायनाट व्हावा यासाठी शेतकरी औषधी दुकानात धाव घेऊन औषधी खरेदी करतो. यावेळी दुकानदार अमुक शेतकऱ्याने ते औषध फवारले त्याच्या पिकाला फायदा झाला असा दाखला देऊन औषधी व किटकनाशके देतो. उधारीमुळे बरेच शेतकरी बिल मागण्याच्या भानगडीत पडत नाही बरेचदा हे महागडे औषध फवारल्यानंतर त्याचा फायदा होत नाही. त्यानंतर शेतकरी दुसऱ्या विक्रेत्याकडे जातो तोसुद्धा याचप्रमाणे मार्गदर्शन करीत त्याला औषधी देत असतो. हा प्रकार सतत सुरु असतो. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक भुर्दंड बसतो. हा प्रकार बंद होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे.
कृषि तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बैठका घेवून मार्गदर्शन करावे. या बैठका गावात न घेत शेतशिवारात जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना गोळा करून त्यांना पिकावरील विविध रोगाची माहिती प्रभावी किटकनाशके वापरण्याची पद्धतीची माहिती द्यावी. याकरीता कृषी मित्राचे सहकार्य घ्यावे. रोगावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने प्रभावी औषधी माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)