शेतकरी सुखावला! दहा दिवसानंतर वरुणराजा प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 05:00 AM2021-07-09T05:00:00+5:302021-07-09T05:00:34+5:30
साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात सकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तब्बल दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, धानपिकाला जीवदान मिळाले आहे. आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धानाच्या नर्सरीत पेरणी केली होती. पऱ्हे रोवणी योग्य झाले होते; परंतु दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नर्सरीच्या जमिनीला तडे जात होते. नर्सरीतील कोवळे पऱ्हे पिवळे पडू लागले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अशातच बुधवारी सायंकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले. रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून दमदार पावसाला प्रारंभ झाला. भंडारा शहरात पहाटेपासून पाऊस बरसत होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत पाऊस कोसळला. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला.
तुमसर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी रिमझिम पाऊस बरसला होता. गुरुवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पवनारा, चिचोली, बघेडा, नाकाडोंगरी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. मोहाडीत विजेच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे धानपऱ्ह्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे मोहाडीत अंधार पसरल्यासारखे दिसत होते. वीज पुरवठाही खंडित झाला होता. उसर्रा येथेही दमदार पावसाने हजेरी लावली. वरठी परिसरात पावसाने हजेरी लावताच विद्युत पुरवठा खंडित झाला. आंधळगाव परिसरात पहाटे ४ वाजतापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. आर्द्रा नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. जांब, लोहारा परिसरात सकाळपासूनच रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी सुखावले होते.
साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात सकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता. ठाणा जवाहरनगर मार्गावर शुकशुकाट दिसत होता. पहेला परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांवरील संकट टळले. पवनी तालुक्यातही सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आसगाव (चौ.) परिसरात धानाच्या बांध्या पावसाने पूर्णत: भरल्या होत्या. पवनी-आसगाव मार्गावरील माती वाहून गेल्याने दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. अड्याळ येथे सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. करडी परिसरात पहाटे २.३० वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी आता रोवणीला सुरुवात केली.
जिल्ह्यात आतापर्यंत ३१९ मिमी पाऊस
- भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१९.६ मिमी पावसाची नोंद झाली, तर गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसांपासून पावसाने खंड दिला असला तरी जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै यादरम्यान कोसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १०३ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासांत भंडारा ४.९ मिमी, मोहाडी ४९.४ मिमी, तुमसर १३.२ मिमी, पवनी १.६ मिमी, साकोली २७.६ मिमी, लाखांदूर ७.१ मिमी आणि लाखनी तालुक्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लाखांदूरमध्ये अनेक घरात शिरले पाणी
- लाखांदूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. गटारांच्या दुरावस्थेमुळे प्रभाग ५, ८ आणि ९ मधील सुमारे ७० घरांमध्ये पाणी शिरले. त्यात एका माजी नगरसेविकेच्या घराचादेखील समावेश आहे. मुख्याधिकारी डाॅ.सौरभ कावळे यांनी या प्रभागाची पाहणी केली. तेथील जनतेच्या समस्या समजावुन घेतल्या. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. घरातील धान्य, कपडालत्ता व इतर साहित्य ओले झाले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे शेतकरी मात्र सुखावल्याचे दिसत आहे.
रोवणीच्या कामाला वेग
- जिल्ह्यात दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने रोवणीचे काम खोळंबले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून बरसलेल्या दमदार पावसाने आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५ हजार ८३२ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धानाचे क्षेत्र १ लाख ८३ हजार २५ हेक्टर आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने केवळ २ हजार हेक्टरवरच रोवणी झाली होती. आता रोवणीला वेग येणार आहे.
बावडी मंदिरात शिरले रस्त्यावरचे पाणी
- तुमसर शहरातील बावळी मंदिरात गुरुवारी पावसाचे पाणी शिरले. शिवलिंगला पाण्याने वेढा घातला होता. पाण्याच्या निचराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पाणी मंदिरात शिरले. मंदिर कमिटीने अनेकदा नगरपालिका प्रशासनाला माहिती दिली होती. भाजप कार्यकर्ते अर्पित जयस्वाल यांनी नगरपालिका प्रशासनाला सदर समस्या दूर करण्याची मागणी केली.
पारडी येथे वीज कोसळून दोन म्हशी ठार
- मोहाडी तालुक्यातील पारडी येथे गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन म्हशी ठार झाल्या. मोहाडी तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळला. शेतात चरत असलेल्या दोन म्हशींवर अचानक वीज कोसळल्याने दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या. शेतकऱ्याचे यामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान कुठेही झाले नाही.