शेणखताला आला सोन्याचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 02:33 PM2024-05-04T14:33:19+5:302024-05-04T14:34:43+5:30
Bhandara : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेणखताकडे वळला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सानगडी : काही वर्षांपासून रासायनिक खताच्या अतोनात वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी मात्र जमिनीचा कस हळूहळू कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी शेणखताकडे वळला आहे. मात्र, शेतीत टाकण्यासाठी लागणाऱ्या शेणखताचा तुटवडा असल्याने याच शेणखताला आता सोन्याचा भाव आल्याचे चित्र सध्या ग्रामीम भागात पाहावयास मिळत आहे.
आपल्या देशात बहुतेक लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखताचा वापर कमी होत आहे आणि रासायनिक खताचा वापर वाढला आहे. मात्र, रासायनिक खाताच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. हे गंभीर परिणाम लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा सेंद्रिय खताकडे वळला आहे. सध्या पंधराशे रुपयांपर्यंत ट्रॅक्टरची ट्राली भरून शेणखत मिळत आहे. शेणखताने जमीनही पिकते आणि आरोग्यही टिकून राहते. रासायनिक खतामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
रासायनिक खताचे दुष्परिणाम
रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. शेतजमीन नापिक होण्याचा धोका असतो. पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. पाण्याचे स्रोत दूषित होतात.
रासायनिक खताच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते. तरीही रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढला आहे. परिणामी जमिनीचा मूळ पोत दिवसेंगणिक खराब होत चालला आहे. सांगुही किवा जनजागृती करूनही सेंद्रीय खतांचा वापर हवा तसा वाढलेला नाही. त्यामुळ सध्या हळूहळू का असेना सेंद्रीय खताचा वापर वाढणे अंत्यत आवश्यक झालेले आहे.