हळद लागवडीकडे वळतोय शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:14+5:302021-03-22T04:32:14+5:30
बाराभाटी : धान पिकाला फाटा देत, जिल्ह्यात नवनवीन पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता शेतकरीही ...
बाराभाटी : धान पिकाला फाटा देत, जिल्ह्यात नवनवीन पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता शेतकरीही आपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर नवनवे प्रयोग करताना दिसत आहेत. येथील शेतकरी किशोर तरोणे यांनीही आपल्या शेतात हळद लागवडीचा प्रयोग केला असून, त्यांनी यंदा १० क्विंटल पीक घेतले आहे.
नवेगावबांध येथील शेतकरी किशोर तरोणे यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून हळदीची लागवड केली होती. आता हळदीचे पीक निघाले आहे, त्यावर प्रक्रिया करावी लागते, परंतु नवेगावबांध परिसरात हळदीचे पीक खूप कमी प्रमाणात घेतले जात असल्यामुळे, नवीन तंत्रज्ञानाने हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी अवजारे उपलब्ध नाहीत, तसेच ते खरेदी करणेही शक्य नाही.
त्यामुळे पारंपरिक पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करणे सुरू आहे. यामध्ये हळदीला पाण्यामध्ये उकळून शिजविले जाते व वाळविल्यानंतर तिला भरडण्यात येते. त्यामुळे आपल्याला खाण्यायोग्य हळद निर्माण होत असून, ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केल्यास मजुरीवरील खर्च १० पटीने वाढतो, परंतु पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या वर्षी शेतात झालेत्या १० क्विंटल हळदीवर ही पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली.