उन्हाळी धान खरेदीच्या मुदतवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:28+5:302021-07-17T04:27:28+5:30
उन्हाळी हंगामात अस्मानी संकटाचा सामना करीत धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर नाव नोंदणी करण्यात आली. कोठार, बारदाना या समस्यांनी धान ...
उन्हाळी हंगामात अस्मानी संकटाचा सामना करीत धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर नाव नोंदणी करण्यात आली. कोठार, बारदाना या समस्यांनी धान खरेदी प्रभावित झाली. शासन स्तरावरून त्यांनासुद्धा अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या व आधारभूत केंद्रांच्या प्रमुखाकडून त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने आधारभूत केंद्राने मिळेल त्या ठिकाणी धान मोजणी केलेली आहे. एका आधारभूत केंद्राला ५ ते १० गावे जोडलेली आहेत. कोठार व्यवस्था अल्प असल्याने ठिकठिकाणी धान मोजणी केली आहे. तात्पुरत्या कोठार आधाराने मोजलेले धान पावसाने भिजण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर उचल होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने दिलेली ३१ जुलैची डेडलाइन पूर्ववत करून धान खरेदी केंद्रांना अपेक्षित बारदाना पुरवावा. अन्यथा शेतकऱ्यांचे धान आधारभूत केंद्रावर मोजणे कठीण होणार आहे.
बॉक्स
मोजणी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाहीत. रोवणी हंगाम जोमात असल्याने शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे मिळाले आहेत; परंतु पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेच्या शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाचे अजूनही चुकारे मिळालेले नाहीत. पालांदूर सेवा सहकारी संस्थेंतर्गत २५ हजार ३९२ क्विंटल धानाची मोजणी आटोपली आहे. ६२९ शेतकऱ्यांनी धान मोजलेले असून, आणखी काही शेतकरी प्रतीक्षेत आहेत.