शेतकऱ्याने जाळले उभ्या शेतातील धान पीक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 08:16 PM2020-10-28T20:16:40+5:302020-10-28T20:17:11+5:30
वडेगावातील प्रकार : तुडतुड्याने अडीच एकरातील पीक केले नष्ट
- संजय मते
आंधळगाव (भंडारा) : तुडतुडा कीडीच्या प्रादूर्भावाने अडीच एकरातील धान पीक नष्ट केल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने उभ्या शेतातील धान पीक जाळून टाकले. हा प्रकार मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे बुधवारी घडला. हातात पीकच येणार नसेल तर काय करावे, असा सवाल या शेतकऱ्याने केला.
ईश्वर श्रावण माटे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी अडीच एकर शेतात उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली. पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर धान चांगला बहरला. संपूर्ण हंगामात धानावर ४५ हजार रूपये खर्च केला. त्यासाठी त्यांनी कर्जही घेतले. परंतु आता धानावर तुडतुड्याने आक्रमण केले. अडीच एकरातील पीक नष्ट झाले. केवळ शेतात तणसच शिल्लक दिसू लागले. यामुळे संतप्त झालेल्या ईश्वरने बुधवारी दुपारी उभ्या शेतातील धानाला पेटवून दिले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी संगीता, मुलगा अभिजीत, भाऊ रामेश्वर, किशोरही उपस्थित होते.
आगामी सण कसे साजरे करावे, लोकांचे कर्ज कसे द्यावे, अशी विवंचना ईश्वरला लागली आहे. मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचे आक्रमण झाले असताना आतापर्यंत कोणतीही मदत झाली नाही. शासनाने आता कीडींमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी आहे.