चांदपूर जलाशय पाणी वाटपाच्या सभेत शेतकऱ्यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:00 AM2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:51+5:30
चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यासाठी पाटबंधारे विभाग रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत आहे. गेल्यावर्षी डाव्या कालव्यांतर्गत काही कालव्यांना पाणी वितरित करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक गावे वंचित राहिली. या गावांचा आजवर विचार करण्यात आला नाही.
रंजित चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाच्या पाणी वितरणासंदर्भात तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ही सभा निर्णयाविणाच रद्द करण्यात आली. सभेतील गोंधळ नियंत्रणासाठी पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले होते.
चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यासाठी पाटबंधारे विभाग रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत आहे. गेल्यावर्षी डाव्या कालव्यांतर्गत काही कालव्यांना पाणी वितरित करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक गावे वंचित राहिली. या गावांचा आजवर विचार करण्यात आला नाही. उन्हाळी धान पिकाला पाणी वितरीत करताना सरासरी १२०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यापेक्षा अधिक क्षेत्र ओलीत करता येत नाही. पाणीटंचाईचे निकष लावून जलाशयातील पाणी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या निकषाच्या अधिन राहून पाटबंधारे विभाग उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करतो. त्याच्या नियोजनासाठी बुधवारी सिहोरा येथे शेतकºयांची सभा आयोजित केली होती. या सभेला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते.
रोटेशन पद्धतीनुसार यंदा उजव्या कालव्यांतर्गत गावांना पाणी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याला कुणीही विरोध केला नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गतची गावे सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. या गावांना पाणी मिळत नाही. अशा गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सुरू झाली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. बैठकीतून लोकप्रतिनिधी आणि कर्मचाºयांनी काढता पाय घेतला. शेतकºयांची मोठी गर्दी झाली होती. गोंधळ वाढत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पाणी वाटपासंदर्भात कोणताही निर्णय न होता ही सभा रद्द करण्यात आली. बैठकीला सभापती धमेंद्र तुरकर, रमेश पारधी, राजेश पटले, बंडू बनकर, उमेश कटरे, किशोर रहांगडाले, पाटबंधार विभागाचे भांबरे, हटवार, मिरत उपस्थित होते. आता काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.