शेतकऱ्याच्या मुलीने राष्ट्रीय सायकल स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:24+5:302021-04-12T04:33:24+5:30
सुशिकला ही निलज/खुर्द येथे राहणाऱ्या दुर्गाप्रसाद आगाशे या शेतकऱ्याची मुलगी आहे. नुकतेच तिने हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ...
सुशिकला ही निलज/खुर्द येथे राहणाऱ्या दुर्गाप्रसाद आगाशे या शेतकऱ्याची मुलगी आहे. नुकतेच तिने हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे. सहाव्या वर्गात असताना तिच्यातील खेळाची आवड बघून शिक्षकांनी सुशिकलाला तुडका येथिल क्रीडा प्रबोधिनीत जाण्याचा सल्ला दिला. ती रोज तिच्या वडिलांबरोबर सकाळी व सायंकाळी तुडका येथील मैदानावर खेळण्याकरिता जात असे. पुढे तिची निवड पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीकरिता झाली आणि तिच्या खेळाला दिशा मिळाली. सायकल चालविण्यात पारंगत झालेली सुशिकला आशियाई क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया युथ यासारख्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.
बॉक्स
बहीण निकिताची हॉकीत चमकदार कामगिरी
मोहाडी तालुक्यातील १२०० लोकसंख्येच्या निलज खुर्द या लहानशा गावातील सुशिकलाने सायकल क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले तर तिची लहान बहीण निकितानेही हॉकी क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करीत मोठ्या बहिणीचा कित्ता गिरविला. राष्ट्रीय हॉकीत अनेकदा निकिताने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य पातळीवर अनेक हॉकी स्पर्धांत संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरीचा परिचय करुन दिला आहे.
कोट
' ज्यावेळी मी सायकल स्पर्धेत खेळायला सुरुवात केली, त्यावेळी गावातील लोक माझ्या आईवडिलांना माझ्या बाहेर राहण्यावरून, खेळाचे कपडे वापरण्यावरून खोचक बोलायचे, ते लोक आज स्वत:च्या मुलामुलींना खेळायला पाठवतात. माझ्या यशाने हे परिवर्तन झाल्याने आज समाधान वाटते. '
- सुशिकला आगाशे, आंतराष्ट्रीय सायकलपटू