कर्ज परतफेडीचे भूत शेतकऱ्यांच्या ‘मानगुटीवर’
By admin | Published: March 23, 2016 12:41 AM2016-03-23T00:41:35+5:302016-03-23T00:41:35+5:30
वित्तीय वर्षाचा हिशेब चोख करण्याचा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद करणे...
मार्च एंडिंगचा शेतकऱ्यांना धसका : बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा, निसर्गाच्या चक्रव्यूव्हात अडकला पोशिंदा
गिरीधर चारमोडे भंडारा
वित्तीय वर्षाचा हिशेब चोख करण्याचा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद करणे या दिवसी होतो. शेतकऱ्यांसोबतच, नोकरदारवर्ग सुद्धा धावपळ करतात. परंतु या महिन्यात सर्वाधिक धास्ती भरते ती शेतकरी व शेतमजूर वर्गात. कर्जाचा निपटारा करण्यासाठी बँक, पतसंस्था बचत गट, सावकार कर्ज वसुलीचा तगादा लावतात. त्यामुळे तूर्त शेतकरीवर्गाने धसका घेतल्याचे दिसून येत आहे.
जगाचा पोशिंदा अशी बिरूदावली असली तरी शेतकरी हा समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक आहे. वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करून रक्ताचे पाणी करून बँका व इतर ठिकाणाहून कर्ज काढून जमीन कसतो. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे.
शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पीक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. खरीपाचे पीक हे प्रमुख पीक असते व त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची वर्षभराची लेनदेन चालते. परंतु सालाबादाप्रमाणे याहीवर्षी तुटपुंज्या पावसामुळे व शेवटच्या क्षणी रोगराईमुळे अपेक्षेपेक्षाही फारच कमी उत्पादन झाले. शेतकरी, हितचिंतक व इतरही शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकरी लालफितशाही व उदासीन शासनपद्धतीमुळे, शासकीय मदतीपासून वंचितच राहिला.
यामध्ये भर पडली ती सहकारी बँकेच्या पत्राने. जिल्हा मध्यवर्ती बँकेने गावागावात, सार्वजनिकस्थळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीचे एक प्रकारे आवाहन करून तगादाच लावला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील एकही गाव ५० पैसेपेक्षा कमी आणेवारीचा नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी कर्जाची वसुली जमा करणे आवश्यक झाले आहे.
या पत्रामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे उरली सुरली आशा सुद्धा आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्याशिवाय पर्यायच नाही. अन्यथा पुढील वर्षीचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खरीपाबरोबरच रब्बीने सुद्धा दगा दिला. अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. कर्जाचा भरणा करायचा कसा हा तर प्रश्न आहेच. परंतु थकीत झाल्यास त्यावरील व्याज व पुढील हंगामासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हाही प्रश्न तेवढाच शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
३१ मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करण्यासाठी, शेतकरी सधन नातेवाईकांकडे हात पसरत आहेत. परंतु आल्या पावलीच वापस यावे लागते. कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकरी विविध, कधी नव्हे असे आकडेमोड करीत आहेत. परंतु काही एक शक्य होताना दिसत नाही. येणारे लग्नसराईचा खर्च, घरदुरुस्तीचा खर्च, आरोग्याचा, शिक्षणाचा खर्च कुठून करायचा हे सगळे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असून कर्जपरतफेडीचा भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला, एवढे मात्र निश्चित आहे.