खसरा दर्जअभावी शेतकरी पीक कर्जापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:53+5:302021-06-17T04:24:53+5:30
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील गट क्रमांक ३०० आणि गट क्रमांक १०६ ची शेती अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी ...
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील गट क्रमांक ३०० आणि गट क्रमांक १०६ ची शेती अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ व २००८ च्या आदेशानुसार २०१६ मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मिळाली. तेव्हापासून या शेत जमिनीवर शेतकऱ्यांची मालकी जोत व कब्जा आहे. या जागेवर पीककर्ज उचल करावयाचे असल्याने सदर गटाच्या शेतावर यावर्षीच्या खसराची नोंद नसल्याने पीककर्ज उचलण्यास अडथळा निर्माण होत आहे. यापूर्वी शासनाकडून पीककर्ज नियमितपणे मिळत होते. मात्र, या वर्षीच्या सातबारावर खसरा दर्ज करण्यात आला नसल्याने त्यांना पीककर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेती कशी करायची, असा प्रश्न त्या नऊ शेतकऱ्यांवर येऊन ठेपला आहे. या नऊ शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेऊन समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी उपजिल्हाधिकारी (महसूल) यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. निवेदनावर नंदकुमार पोटवार, मंगला पोटवार, भीमराव मेश्राम, कल्पना कांबळे, महादेव खंडाते, यादोराव खंडाते, उदाराम खंडाते, मदन सय्याम, हंसदास मांढरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.