शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनो स्वतःचा ब्रँड विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:10+5:302021-01-18T04:32:10+5:30
भंडारा: शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या धोरणाचा स्वीकार करून शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि शेती व्यवसायात आधुनिक ...
भंडारा: शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या धोरणाचा स्वीकार करून शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतमाल विक्रीसाठी आपला स्वतःचा ब्रँड विकसित करावा, असे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.
ते तालुक्यातील परसोडी, बेला शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत या संकल्पनेवर आधारित शेतकरी ते ग्राहक अंतर्गत काही ठिकाणी हवे आणि भाजीपाला विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही. त्यामुळे थेट ग्राहकांपर्यंत आपला शेतमाल पोहोचत असल्याने आता शेतकऱ्यांनी एकत्रित गटशेती करून आपला स्वतःचा शेतमाल विक्रीचा ब्रँड विकसित करावा, असे आवाहन कोटांगले यांनी शेतकऱ्यांना केले. यासोबतच त्यांनी तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका तसेच सेंद्रिय शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच परसोडी येथील जागेश्वर वंजारी यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या पॅक हाऊसची पाहणी केली.
शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आता एकाच प्रणालीद्वारे सिस्टीम उभारले असून आता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जिल्ह्याबाहेर पोहोचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जिल्ह्यातील धान पीक हे प्रमुख पीक असून आज आपल्या जिल्ह्यासह राज्यात धानाला चांगली मागणी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करून शेतकरी कंपन्यांमार्फत मार्केटिंगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.असे केल्यास उत्पादन खर्च ही कमी येत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी तालुक्यातील मका लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक आतून सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भंडारा तालुक्यातील कृषी अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.