फुलकोबीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:17 PM2018-02-11T23:17:57+5:302018-02-11T23:18:30+5:30
भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे.
मुखरु बागडे।
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे. एकाचवेळी फुलकोबीचा हंगाम फुलल्याने कावडीमोल भावाने फुलकोबी विकत आहे. घाऊक भाव दोन रूपये तर चिल्लर भाव चार ते पाच रूपये प्रतिकिलो ने फुलकोबी विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकरी अफाट आशेपोटी नव नवे पीक घेत नवे काही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पळसाला पान तीनच या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याच्या नशिबी केवळ दारिद्रच अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारात व भंडारा येथील बीटीबी मंडितही फुलकोबीचे भाव घसरले आहे. यामुळे कोबी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी तरळते आहे.
महागाईच्या चक्रात सर्वांनीच आपापली स्थाने घट्ट केली खरे पण शेतकरीच असा अपवाद आहे की त्याला महागाईचा फटका बसतो, पण लाभ मिळत नाही. फुलकोबी बियाणा १० ग्रॅमला ४०० रूपये मोजावी लागतात. एक महिना रोपात वाढवावा लागतो. त्यानंतर दोन ते अडीच महिने त्याची लागवड करून पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून बाजारात मागणी कोबीला भाव नसल्याने व विक्रीला अधिकच त्रास वाढल्याने फुलकोबीची शेती नाकीनऊ आणणारी ठरली आहे.
ढगाळ हवामानामुळे कोबी काढणीला नियमितपेक्षा लवकरच येते. अळीचा, मावाचा त्रास वाढतो. शेतात वाया जाण्यापेक्षा बाजारात जे मिळतील ते म्हणत शेतकरी अख्या परिवारासह फुलकोबीच्या मळ्यात खपत आहे.
जेवढ्या दिवस ढगाळ हवामान राहील तेवढे नुकसान कोबीला होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात वादळवाऱ्यासह गारपीटचा अनुमान वर्तवल्याने शेतकरी घाबरला आहे. मागील चार वर्षापूर्वी २२ फेब्रुवारीला अशाच गारपिटीचा तडाखा सहन करीत पूर्ण शेतचे शेत पिकाचे नष्ट झाले होते, ती आठवण अजूनही शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.
अत्यल्प पाण्याचा विचार करता मी फुलकोबीचे उत्पादन घेतले. धान निघाल्यानंतर फुलकोबीचा हंगाम सजविण्याकरिता हात उसणवारी करून बागायती शेती केली. अख्खे कुटुंब श्रम उपसतो. यंदा धानही न पिकल्याने बागायत तरी आधार मिळेल अशी आशा असताना तिही मातीमोल ठरली आहे.
-मोहन लांजेवार, फुलकोबी उत्पादक पालांदूर.
धान निघाल्यानंतर एकाचवेळी बागायतीचा हंगाम येतो. याचा परिणाम बाजारपेठेवर पडतो. जे विकते ते पिकवा हे सुत्र स्विकारले तर बागायतीत नवी आशा निश्चित मिळू शकते. या वर्षाला भेंडी, मिरचीला अपेक्षित भाव मिळत आहे. पावसाळ्याची बागायती निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. शेतकºयांनी गटागटाने पीक निश्चित करून उत्पादन घ्यावे. यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता असते.
-बंडू बारापात्रे, थोक भाजी व्यापारी बीटीबी.