कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By admin | Published: May 9, 2016 12:36 AM2016-05-09T00:36:14+5:302016-05-09T00:36:14+5:30
गारपिटीमुळे कांद्याची वाढ झाली नाही. भाव मिळत नसल्याने पिकाला लागलेला खर्चही निघाला नाही.
कवडीमोल दर : अवकाळी पावसाचा फटका, कर्जाचा बोजा, शासनाने हमी भाव देण्याची गरज
पवनी : गारपिटीमुळे कांद्याची वाढ झाली नाही. भाव मिळत नसल्याने पिकाला लागलेला खर्चही निघाला नाही. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात असून बँका, सावकार यांचे कर्ज, कृषी केंद्राची उधारी देणे कठीण झाले आहे. लग्न सोहळे व अन्य प्रसंगही स्थगित ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे यावर्षी कांद्याने गृहिणींच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्याच डोळ्यांत पाणी आणल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. यामुळे या परिसरात कांद्याचे विक्रमी पीक घेण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागत होती. कांद्याचे उत्पादन होवो अथवा न होवो काही शेतकरी पूर्वीपासून कांद्याचे पीक वर्षानुवर्षे घेत आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी शेतकरी या परिसरात एकरी १०० ते ११० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेत होते. तेवढ्या पिकावर शेतकऱ्यांचा कांदा पिकाला लागलेला खर्च निघून नफा मिळत होता. यामुळे शेतकरी समाधानी होता; पण मागील वर्षापासून शेतकऱ्याला लागलेला खर्च निघत नसून तोटा येत आहे.
नैसर्गिक आपत्ती, वाढते रासायनिक खताचे दर, वाढती मजुरी, कांदा बियाचे वाढलेले दर व कांदा पिकाला कवडीमोल मिळणारा भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्याची स्थिती आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करण्यासाठी १६०० ते १८०० रुपये पायली या भावाने कांद्याचे बियाणे विकत घेतले. सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात वाफे तयार करून रोपे तयार केली.
कांदे रोपाची लागवड करण्याकरिता शेताची मशागत करून शेणखत फेकणे, एकरी तीन-तीन पोते पोटॅश व सुपर फॉस्पेटची रासायनिक खते फेकणे, डिसेंबर ते जानेवारी महिन्यात रोपांची वाफ्यात पाणी सोडून महिला मजुरांकडून त्याचे रोपण केले जातात. यानंतर खते व मशागतीचा मोठा खटाटोप करूनही शिल्लक उरत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी उत्पादित नवीन कांद्याला चार रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे नुकसान सोसावे लागत असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)