कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By admin | Published: June 17, 2016 12:41 AM2016-06-17T00:41:20+5:302016-06-17T00:41:20+5:30
पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या
उत्पादन खर्च जास्त, हमी भाव कमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा
प्रकाश हातेल चिचाळ
पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या चिचाळ परिसरात ७०० ते ८०० एकर जागेमध्ये कृषी मार्गदर्शकांच्या माध्यमातून कांदा पिकाची लागवड करण्यात आली.आता कांदे खोदणीला सुरुवात करायची एवढ्यात निसर्ग कोपला. बळीराजावर शेवटचा झटका देवून पिकाचे अतोनात नुकसान केले. काही शेतकऱ्यांनी कसेबसे कांदे खोदून बाजारपेठेत आणले असता कांद्याचा भाव कवडीमोल म्हणजे ४ ते ५ रुपये भावाने कांदा व्यापाऱ्यांना द्यावे लागले.
जेव्हा शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल तेव्हा मात्र शासन मुग गिळून गप्प राहाते. म्हणजे शेतकऱ्याला निसर्गाचीही भिती आणि व्यापाऱ्याचीही भिती. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? निसर्गाच्या कचाट््यात अनेक कांदा उत्पादक शेतकरी सापडला गेला. चिचाळ परिसरात फार मोठे कांद्याचे नुकसान झाले. चिचाळ, पाथरी, आकोट, वासेळा, गोसे गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या घराचे छत उडाले, कवेलू फुटले. संबंधीत अधिकाऱ्याला सुचना दिल्यानंतर अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमदार यांनी चिचाळला भेट देवून पंचनामे केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देवून पंचनामा केले. परंतु दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. कांदा उत्पादन शेतकऱ्याला खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंदयाला कर्जाच्या बेळीतून काढणार कोण? शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार? यांच्या शेतमालाला योग्य भाव केव्हा मिळणार? असे अनेक प्रश्न बुध्दीजीवी करीत आहेत.
पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले, गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नविन पिढीचा कल बदल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा, यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. शेवटी तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती तालूक्यातील बळीराजाची झाली आहे.
बळीराजाला जिवंत ठेवायचे असेल तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध समस्या शासन दरबारी लावून धराव्यात, पवनी तालुक्यात एम आय डी.सी प्रोजेक्ट कारखानदारी, छोटे मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील. तरच तालुक्यातील शेतकरी राजा सुखावेल. तालुक्यातील गारपिटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.