कृषिपंपाच्या जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट
By Admin | Published: December 24, 2014 10:54 PM2014-12-24T22:54:17+5:302014-12-24T22:54:17+5:30
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही.
संजय साठवणे - साकोली
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. खरीप पिक तर गेलेच मात्र रबीचेही पीक विज पुरवठ्याअभावी जाणार का असा प्रश्न आता साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभरात साकोली तालुक्यातील सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची माहिती राज्य शासनाला आहे.
युती सरकारणे शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटीचे पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असली शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या वनवासाचे काय, साकोली तालुक्यात ९६ गावे असून या तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथे पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. साकोली तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. तर ज्या शेतकऱ्यांजवळ वाटरपंपाची सोय आहे ते शेतकरी कसेबसे शेती करून उदरनिर्वाह करतात. ज्यांच्याजवळ सिंचनाची सोय नाही ते निसर्गावरच अवलंबून शेती करतात.
यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने खरीप पीक गेली. त्यामुळे आता रब्बी पिकावर शेतकऱ्यांची आशा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात विहीरी व बोरवेल केल्या व विजेसाठी वितरण कार्यालयाच्या चकरा मारतात. पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी पिकासाठी पऱ्हे भरले असून रोवणीसाठी वीज जोडणीसाठी वाट पाहत आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना व पॅकेजच्या रूपाने मदतीची घोषणा करते. मात्र अधिकारी व कर्मचारी या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचू देत नाही, ही विदारक परिस्थिती आत्महत्यासाठी भाग पाडते.