धानाचे चुकारे अडल्याने शेतकरी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:09+5:302021-08-21T04:40:09+5:30
गेल्या तीन महिन्यापासून उन्हाळी धानाचे चुकारे अडले आहेत. सणासुदीचे दिवस असताना शेतकऱ्यांचे हातात पैसे नाहीत. खरीप हंगामातील शेती लागवडीसाठी ...
गेल्या तीन महिन्यापासून उन्हाळी धानाचे चुकारे अडले आहेत. सणासुदीचे दिवस असताना शेतकऱ्यांचे हातात पैसे नाहीत. खरीप हंगामातील शेती लागवडीसाठी आलेला खर्च देण्यास पैसे नसल्याने शेतकरी शासनाच्या विरोधात चांगलेच संतापले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर चुकारे देण्यात येत नाहीत. सत्ताधारी बोलायला तयार नाहीत. यामुळे वाढता रोष आहे. दरम्यान, कुटुंबीयांचे उदरनिर्वाह अडचणीत आले आहे. मजूर, शेतमजूर व साहित्याचे वेतन देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी सावकारांच्या दारात पोहोचला आहे. शेतीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. यासंदर्भात शासनाला अनेक निवेदने देण्यात आली आहेत; परंतु शासनाच्या पाषाण हृदयाला बोचत नाहीत. शेतकऱ्यांचे चुकारे देण्यासाठी सकारात्मक निर्णय तातडीने घेतले जात नाहीत. परिसरातील सत्ताधारी राजकीय नेते शासनाच्या ध्येयधोरणावर दबाव निर्माण करीत नाहीत. यामुळे आक्रोश व संताप आहे. संतापाचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलनाचे नेतृत्व भाजप किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोरकर, डॉ. अशोक पटले, किशोर राहगडाले, विनोद पटले, बंटी बानेवार, विकास बिसने, खुमान शरणागत, मयूरध्वज गौतम, गजानन निनावे, सतीश चौधरी, करणार आहेत. या परिसरात लागोपाठ रास्ता रोको आंदोलन घोषित करण्यात आले आहे. किसान गर्जनाचे आंदोलन २२ ऑगस्टला चुल्हाड बस स्थानकावर होत आहे. शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी वाहनातून जागृत करण्यात येत असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.
कोट
धानाचे चुकारे अडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यापूर्वी निवेदन दिले आहेत; परंतु दखल घेण्यात आली नाही. यामुळे सिहोरा गावात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी तुमसर.
निश्चितच शेतकऱ्यांना अडलेले धानाचे चुकारे मिळाले पाहिजे, अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील आहेत. जलद गतीने शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उमेश तुरकर, तालुकाध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती, तुमसर.