पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:03 PM2024-08-08T12:03:38+5:302024-08-08T12:05:20+5:30
Bhandara : निवडणुकीपुरतीच योजनेची अंमलबजावणी होती का? शेतकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न
रवींद्र चन्नेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ लागली आहे. लाखांदूर तालुक्यात आजही खरीप हंगामातील शेतीवर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यानुसार मागील वर्षी राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. त्याचा पहिला, दुसरा हप्ता टप्प्याटप्प्याने दिला. त्यानंतर २८ फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीआधी दोन्ही एकदम हप्ते दिले.
शेतकऱ्यांची शेती ही हवामानावर अवलंबून असते. पोषक हवामान मिळाले, तरच शेतीत चार पैसे मिळतात. त्यातच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित आवश्यक तो हमीभाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत नसल्याने त्यांनी काढलेली कर्जे भरली जात नाहीत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गतच राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले. मात्र, जूनमध्ये पेरणीसाठी राज्याचा हप्ता मिळेल अशी आशा होती. मात्र, पाच महिने झाले, तरीही हप्ता मिळालेला नाही.
"राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता फेब्रुवारीनंतर मिळालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी उसने-उधार करून, कर्ज काढून पैसे घेतले आहेत. सध्या पेरणीनंतर आंतरमशागत आणि खते, कीटकनाशके फवारणीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आस लागली आहे."
- रूपेश पागोटे, शेतकरी