उपसा सिंचनमुळे ४३ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 05:12 PM2024-06-07T17:12:46+5:302024-06-07T17:13:13+5:30
नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला आढावा : नियोजन करण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून सांगवारी आणि धारगाव या दोन उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली आहे. धारगाव उपसा सिंचन योजनेमुळे १८ गावांतील शेतकऱ्यांना तर, सांगवारी योजनेमुळे पेच प्रकल्पाच्या काळव्याच्या टेलवर निर्भर असलेल्या २९ गावांतील ७,०३१ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. ४३ गावांना सिंचनाचा लाभ देणाऱ्या या योजनेच्या कामाचा आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चर्चेतून आढावा घेतला.
भंडारा व पवनी तालुक्यांतील चार उपसा सिंचनसंदर्भात विदर्भ पाटबंधारे महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक सोनटक्के आणि अन्य अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान हा आढावा घेण्यात आला.
या सोबतच तीरीं मिन्सी उपसा सिंचन, कातखेडा उपसा सिंचन प्रकल्पाची मंजुरी आणि नेरला व खापरी (रेहपाडे) या गावांच्या पुनर्वसन संदर्भातही चर्चा करण्यात आली. सांगवारी आणि धारगाव या योजनांच्या प्रथम टप्प्याच्या निधीलाही सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही - प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी अभ्यासपूर्ण काम करण्याची सूचना भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. योजनेची कामे लवकरात लवकर प्रारंभ करून विस्तारित करण्यासोबत सिंचन योजनेशी विविध विषयांवर चर्चा आवश्यक सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन योजने अंतर्गत क्षेत्रातील ११ गावांना तत्काळ समाविष्ट करण्यासंदर्भातही निर्देश देण्यात आले.
नेरला व खापरी (रेहपाडे) च्या पुनर्वसनावर चर्चा
• या बैठकीत नेरला व खापरी (रेहपाडे) या गावांचे पुनर्वसन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पुनर्वसनाकरिता लागणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी सरकारच्या सिंचन नियामक मंडळाकडे लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.
• पवनी तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा व नचेगाव या तीनही गावांना गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली.