चार महिने होऊनही उसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:14 IST2025-04-17T16:13:41+5:302025-04-17T16:14:49+5:30

Bhandara : मानस अॅग्रो साखर कारखाना देव्हाडा येथील प्रकार

Farmers in trouble as they have not received their sugarcane dues even after four months | चार महिने होऊनही उसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

Farmers in trouble as they have not received their sugarcane dues even after four months

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) :
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (बु.) येथील मानस अॅग्रो साखर कारखान्याला ऊस पुरविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. उसाचा पुरवठाही कारखान्याला केला. त्यानुसार २०२४-२५ हंगामातील उसाचे गाळप झाले. मात्र, चार महिने होऊनही शेतकऱ्यांना उसाचे चुकारे मिळाले नाही, यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.


शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातील उसाचे चुकारे देण्यात आले. मात्र, जानेवारी महिन्यापासून उसाचे चुकारे न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नसल्याने शेतीवर उचललेले कर्ज वेळेवर भरले गेले नसल्याने त्यांच्यावर व्याजासह रक्कम भरण्याची नामुष्की ओढवली आहे. उसाचे पीक वर्षभराचे आहे. त्यामुळे उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उसाचे चुकारे मिळाल्यानंतरच बँकांचे कर्ज फेडावे लागते. मात्र, कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर चुकारे होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे चुकारे वेळेवर मिळतील, की पुन्हा वर्षभर कारखान्याच्या चकरा माराव्या लागतील, हे वेळच ठरवणार आहे. 


नगदी पिकाची लागवड
वेळेवर उसाचे चुकारे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमी केली असून, नगदी मका पिकाची लागवड केली आहे.


"जानेवारी महिन्यात ऊस कारखान्याला नेण्यात आला. मात्र, चार महिने होऊनही उसाचे चुकारे मिळाले नसल्याने माझ्यावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने चुकारे लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी."
- ओमेश्वर मुंगमोळे, शेतकरी


"डिसेंबर महिन्यातील उसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले. जानेवारीपासून देणे बाकी आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांना कार्यक्रमासाठी आवश्यक होते, त्यांना देण्यात आले आहे. उर्वरित २४ ते २५ कोटी उसाचे चुकारे बाकी आहेत, ते लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे."
- विजय राऊत, मानस कारखाना, देव्हाडा (बु)

Web Title: Farmers in trouble as they have not received their sugarcane dues even after four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.