मऱ्हेगाव कालव्याच्या बांधकामाने खराशीतील शेतकरी प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:43+5:302021-07-22T04:22:43+5:30
गत मार्च महिन्यापासून मरेगाव कॅनलवर गोसे खुर्द अंतर्गत बांधकाम जूनपर्यंत करण्यात आले. त्यावेळी प्रभावित शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना शेतकऱ्यांची अडचण ...
गत मार्च महिन्यापासून मरेगाव कॅनलवर गोसे खुर्द अंतर्गत बांधकाम जूनपर्यंत करण्यात आले. त्यावेळी प्रभावित शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना शेतकऱ्यांची अडचण दाखवली. जाण्या-येण्याकरिता रस्ता व बांधांनातील पाणी निचऱ्यासाठी नैसर्गिक उतार अत्यंत आवश्यक आहेत. संबंधित अभियंत्यांना १७ मे रोजी आंबाडी येथे जाऊन लेखी निवेदनही देण्यात आले. लाखनीचे तहसीलदार मल्लिक विराणी यांनाही निवेदन देत समस्या उजागर केली. तहसीलदारांना बांधकाम करून देणार असल्याचे सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सोयीचे होईल, असे काम न झाल्याने शेतकरी समस्येत आलेले आहेत.
पावसाचे दिवस असून, रोवणीसाठी प्रभावित शेतकरी तळमळत आहेत. मंगळवारला योगेश झलके या प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतात एक नवे तीन ट्रॅक्टर चिखलात फसले. चिखलणी झालीच नाही. गावातील आणखी काही ट्रॅक्टर बोलावून एकमेकांच्या आधाराने ट्रॅक्टर चिखलातून काढण्यात आले. पावसाचे पाणी बांधानात अधिक झाल्यास नैसर्गिक उताराने निघण्याचा मार्ग बांधकाम कंपनीने करून दिलेला नाही. भ्रमणध्वनीवरून संबंधित कंपनीच्या अभियंत्यांना सांगितल्यास ''हो'' म्हणतात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या समक्ष काम होत नाही. ही मोठी समस्या खराशी येथील कॅनललगतच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकरी सुमार अडचणीत आला असून, गोसे खुर्द अंतर्गत आंबाडी येथील अभियंता वर्गाने तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.