कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक
By admin | Published: June 23, 2016 12:23 AM2016-06-23T00:23:57+5:302016-06-23T00:23:57+5:30
तालुक्यात शेतकऱ्यांची कृषी केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात लुट केली जात असून चिल्लर खतविक्रीत मोठ्या प्रमाणात लुटमार सुरु आहे.
साकोली : तालुक्यात शेतकऱ्यांची कृषी केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात लुट केली जात असून चिल्लर खतविक्रीत मोठ्या प्रमाणात लुटमार सुरु आहे. या प्रकरणाची कृषी विभागाने चौकशी करून कृषी केंद्रावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतीचा हंगाम लागताच शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु केली. ज्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे भरली. या पऱ्ह्यासाठी लागणारे खत घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर भीड दिसत आहे. शासनाच्या दराप्रमाणे कृषीउद्योग हे खत ८५० रुपये प्रती ५० किलो ला तर युरिया प्रती ५० किलो २९८ रुपये एवढे दर आहेत.
मात्र या दराप्रमाणे चिल्लर विक्रीही करताना कृषीउद्योग हे खत प्रती किलो १७ रुपये किलो प्रमाणे न करता २० रुपये प्रती किलो विकतात तर युरिया हे खत प्रती ५ रुपये ९६ पैसे प्रती किलो न करता १० रुपये प्रतीलिो करतात. दोन्ही खतावर शासनाच्या ठराविक दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले जात आहेत.
कृषी केंद्र धारकांना खत व बि-बियाणांच्या विक्रीचा परवाना देतेवेळीस त्यांच्यासाठी असलेल्या नियमाचीही माहिती दिली जाते. मात्र कृषी केंद्र संचालकाकडून यानियमांना धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची लुट करण्यात येते. प्रत्येक कृषी केंद्रांना खत विकताना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच खतविक्री करायला पाहिजे. जादा दर घेता येत नाही. या प्रकरणाची नक्कीच चौकशी करू. दोषी आढळल्यास कारवाई करू, अशी प्रतिक्रीया पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निमजे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)