शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 09:58 PM2022-10-19T21:58:16+5:302022-10-19T21:59:04+5:30

अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी १४०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करीत आहेत. प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Farmers' paddy at the traders' door | शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात

शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सततच्या पावसाचे संकट झेलत शेतकऱ्यांचा धान घरात आला. दिवाळीपूर्वी आधारभूत केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, आता केंद्र सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी दिवाळी सण साजरा करण्यासाठी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. प्रतिक्विंटल ६०० रुपयांचा फटका सहन करीत आहेत.
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात आली होती. तीनदा झालेली अतिवृष्टी आणि सतत सुरु असलेल्या पावसाने धानाचे मोठे नुकसान झाले. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिंमत न हारता धानाची कापणी सुरू केली. बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हलक्या प्रतीचा धान घरी आला आहे. मात्र, तो विकावा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू झाले की शेतकरी आपला धान पणन महासंघाला देतात. परंतु यावर्षी अद्यापही ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. त्यामुळे धान खरेदी सुरु केव्हा होणार असा प्रश्न आहे.
दुसरीकडे दिवाळी अगदी अवघ्या पाच दिवसावर आली आहे. दिवाळी सण साजरा कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी १४०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करीत आहेत. प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत फिरुन शेतकऱ्यांचे धान खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

अपुऱ्या धान खरेदी केंद्राने होणार अडचण
जिल्ह्यात आतापर्यंत २७ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. आणखी ३० ते ४० धान केंद्रांना खरेदीची परवानगी मिळणार आहे. मात्र, या अपुऱ्या धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २०७ धान खरेदी केंद्र होते.मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. 

सावकारांकडे धाव
- हलक्या धानाचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे तर संपूर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले. एक क्विंटलही धान घरी येण्याची शक्यता नाही. अशा शेतकऱ्यांना आता सावकाराकडे जाऊन पैसे घ्यावे लागणार आहेत. दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेक जण सावकाराच्या दारात दिसत असून काही शेतकरी आपल्या पत्नीचे सौभाग्य लेणे मंगळसूत्र गहाण ठेवण्याच्या तयारीत आहेत. तर अनेक शेतकरी कुणाकडून उसणवार पैसे मिळतात काय याची चाचपणी करीत आहेत.

 

Web Title: Farmers' paddy at the traders' door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.