धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा राडा

By admin | Published: December 3, 2015 12:47 AM2015-12-03T00:47:22+5:302015-12-03T00:47:22+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हमी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र कोठाराची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली.

Farmers' Rada in Paddy Purchase Center | धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा राडा

धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा राडा

Next

अखेर धान खरेदी केंद्र बंद : टोकणनुसार खरेदी न करण्याचा ठपका
पालांदूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हमी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र कोठाराची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांनी त्यांचे धान्य विक्रीसाठी येथे आणले असताना मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा फटका त्यांना बसला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत वाद घातला. यानंतर वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्यांनीच येथील धानाची खरेदी बंद पाडल्याचा प्रकार बुधवारी घडला.
पालांदूर येथे हमी धान केंद्रावर पाच हजार पोते धान उघड्यावर पडले आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असल्याने त्यांच्या धानाची रोज खरेदी होत असतानाच मोजमापाला मात्र विलंब लागत आहे. धानाचे कोठाराची जागा अपुरी पडल्याने तेथील साठा अस्ताव्यस्त पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मोठी गळचेपी होत आहे. धान खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे मोजमाप करण्यात अपयशी ठरत असल्याने टोकन देऊन नंतर मोजणीला बोलाविण्याचा प्रकार सुरु केला आहे.
मात्र धान खरेदी केंद्रावरील ग्रेडर चालबाजी करून वशिलेबाजी किंवा अर्थपूर्ण व्यवहारातून टोकनपूर्वीच काही शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी करीत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला.
दरम्यान पुरुषोत्तम भुसारी हे मागील काही दिवसांपासून चकरा मारुनही त्यांच्या धानाची मोजणी होत नव्हती. त्यामुळे ग्रेडरच्या या प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या सहकाऱ्याने धान खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. वादाचे पर्यवसान शाब्दीक बाचाबाचीत होऊन संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना तंबी देत धानाची खरेदी प्रक्रिया बंद पाडली.
सेवा सहकारी संस्थेच्या कोठाराव्यतिरिक्त भाडे तत्वावर घेण्यात येत असलेले दोन कोठार गावात आहेत. मात्र शासनाच्या नवीन धोरणामुळे त्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने मार्केटिंग फेडरेशनची कसोटी लागत आहे.
खरेदी केलेले धान भरडाईकरिता पाठविल्यास अन्य शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यास जागा उपलब्ध होईल. मात्र फेडरेशनकडून ढिसाळघाई होत असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात भरडल्या जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmers' Rada in Paddy Purchase Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.