सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:48 PM2018-10-01T21:48:32+5:302018-10-01T21:48:48+5:30
जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. धान पीक धोक्यात आले आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असतानाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. यामुळे धान पीक वाळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोहाडी तालुक्यातील वरठी आणि भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी / मोहदुरा : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. धान पीक धोक्यात आले आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असतानाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. यामुळे धान पीक वाळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोहाडी तालुक्यातील वरठी आणि भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे भंडारा-तुमसर आणि भंडारा-रामटेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी उग्र रूप धारण करीत रस्त्यावर टायर पेटवून आपला संताप व्यक्त केला. अखेर सिंचन विभागाने पाणी सोडल्याने खुर्शीपार येथे आंदोलन मागे घेण्यात आले. तर वरठी परिसरातील शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले.
गत महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. प्रचंड उन्ह तापत आहे. धानाच्या शेताला भेगा पडल्या असून पाण्याअभावी पीक वाळत आहे. धान गर्भावस्थेत असल्याने एका पावसाची आवश्यकता आहे. निसर्ग सात देत नाही. परंतु प्रशासनही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रकल्पाचे पाणी सोडावे, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देतात. मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला होता. त्यावेळी दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु आठ दिवस लोटूनही कालव्यात पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भेट घेवून आपबिती सांगितली. माजी आमदार भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी १० वाजता खुर्शीपार येथे एकत्र आले. रस्त्यावर टायर जाळून प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. जोपर्यंत सिंचनासाठी पाणी सोडणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. अखेर चार तासानंतर प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनामुळे भंडारा-रामटेक मार्ग पुर्णत: ठप्प झाला होता. दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात रविंद्र वंजारी, नरेश झलके, विलास लिचडे, करमचंद वैरागडे, नितेश खेत्रे, गुरूदेव लिचडे, देवा वैरागडे, राजेश सार्वे यांच्यासह मोहदुरा, खुर्शीपार, टवेपार, गुंजेपार, जाख, सातोना, हत्तीडोई येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
मोहाडी तालुक्यातील वरठी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच वरठी येथील पाचगाव फाट्यावर शेकडो शेतकरी एकत्र आले. पाणी सोडण्याची मागणी करत राज्य मार्गावर ठिय्या दिला. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अखेर पेंच प्रकल्पाचे १२० गेज पाणी टेलपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे राज्य मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. प्रशानाने ५ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडले नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा राजू कारेमोरे यांनी दिला.
या आंदोलनात मोहाडी पंचायत समितीचे माजी सभापती कमलेश कनोजे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, उपसरपंच सुमित पाटील, मोहगावचे माजी सरपंच राजेश लेंडे, अनिल काळे, ज्ञानिराम साखरवाडे, दिनकर लांबट, अरविंद येळणे, पंचायत समिती सदस्य अस्वमिता लेंडे, सीमा डोंगरे, अर्जुन साखरवाडे, संतुलाल गजभिये, कैलास तितीरमारे, वामन थोटे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदार सुर्यकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन सोनटक्के, पोलीस निरीक्षक विवेक राऊत यांनी आंदोलकर्त्याशी चर्चा केली. आता प्रकल्पांचे पाणी धानाला मिळेल अशी आशा आहे.
अधिकाऱ्याच्या वाहनाला घेराव
खुर्शीपार येथे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर तब्बल तीन तासानंतर सिंचन विभागाचे अधिकारी नितीन सोनटक्के आंदोलनस्थळी पोहचले. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनावर हल्लाबोल करीत घेराव घातला. काही काळ परिस्थिती तणावाची झाली होती. हा प्रकार दिसताच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शेतकऱ्यांना शांत केले. अधिकाऱ्यांना आपल्या वाहनात बसून पाणी सोडण्यासाठी प्रकल्पावर घेवून गेले.
शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटतोय
गत महिनाभरापासून पाऊस नाही. प्रचंड उन्ह तापत आहे. हातातोंडाशी आलेला धान करपत आहे. अशा परिस्थितीत प्रकल्पात असलेले पाणी प्रशासन सोडत नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. गत महिनाभरापासून शेतकरी पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. नाना प्रयत्न करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. निसर्गाने साथ सोडली असताना प्रशासन मात्र मदतीला धावून ये नाही.