दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती मजबूत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:28 AM2018-02-19T01:28:06+5:302018-02-19T01:28:26+5:30
आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
तुमसर : आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.
पंचायत समिती तुमसरच्या वतीने तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी व गौपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माडगी येथे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, शुभांगी राहांगडाले, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, पं.स. सदस्य कनपटे, पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चोपकर आदी उपस्थित होते.
यावेळी नागपूरे यांनी, धानाची शेती करून शेतकरी स्पर्धेच्या युगात कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे लग्न व आवश्यक गरजा कधीही पूर्ण करू शकत नाही. निसर्गामुळे व शासनाच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे न्याय मिळणे अशक्य आहे. धानाची शेती परवडत नाही म्हणून शेतात ऊस लावले. पण कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. दुधापेक्षा बंद बॉटलचे पाणी महाग आहे. शासनाने दुधाचे भाव कमी करून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. परदेशात शेतकऱ्यांकडून दूध खरेदीवर सरकार आधारमूल्यापेक्षा दर लिटर पाच रुपये अतिरिक्त भाव देते. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी चार रुपये अतिरिक्त भाव द्यावा अशी मागणी हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.