शेतकरी पुत्र बनला भारतीय कृषी खात्याचा संशोधक
By Admin | Published: December 24, 2015 12:36 AM2015-12-24T00:36:56+5:302015-12-24T00:36:56+5:30
जिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण कमी दर्जाचे असल्याची धारणा हल्लीच्या पालकांमध्ये दृढावली आहे.
देशातून केवळ ११ जणांची निवड, अभिषेक वाघाये यांची गगनभरारी
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण कमी दर्जाचे असल्याची धारणा हल्लीच्या पालकांमध्ये दृढावली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. हा शिक्षण विभागासमोर चिंतनाचा विषय असला तरी, जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्याने भरारी मारली आहे.
लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील अभिषेक मिताराम वाघाये या विद्यार्थ्याची दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या संशोधकपदी निवड झाली आहे. भंडारा धान उत्पादक व शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत जिल्ह्यातील शेतकरी पुत्र असलेल्या अभिषेक या विद्यार्थ्याने गाठलेले हे यश जिल्हावासीयांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा (वाघ) येथील मिताराम हे सर्वसाधारण शेतकरी. त्यांना पाच मुली व एक मुलगा असे अपत्य आहे. गावात शैक्षणिक वातावरण नसतानाही अभिषेक गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतरचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लाखनी येथील समर्थ विद्यालयात घेवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद गांधी महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षणाची गोडी जीवनात कृषी क्षेत्रात काम करण्याची प्रगल्भ इच्छा असल्याने अभिषेकने बी. टेक पर्यंतचे शिक्षण कॉलेज आॅफ अॅग्री इंजी. अकोला व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे घेतले. त्यानंतरचे एम. टेकचे शिक्षण भूमी व जल व्यवस्थापन अभियांत्रिकी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी खडकपूर येथे पूर्ण केले. कृषी क्षेत्रात योगदान देण्याचा मनात त्यांनी संकल्प केला असल्याने कृषी वैज्ञानिक चयन मंडळाच्यावतीने घेतलेली अॅग्रीकल्चरल रिसर्च सर्व्हीसेसची परीक्षा दिली. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थीही मागे नाही हे दाखवून देत परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. संशोधक या पदासाठी घेण्यात आलेली एआरएस ही परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन्ही भागातील परीक्षेत तो परीक्षकांच्या कसोटीत खरा उतरला. भूमी व जल व्यवस्थापन अभियांत्रिकी या विषयात भारतातून केवळ ११ संशोधकांची निवड करण्यात आली त्यात अभिषेकचा समावेश आहे. केसलवाडा सारख्या ग्रामीण भागातील अभिषेकची भारतीय कृषी अुनसंधान परिषदच्या संशोधकपदी निवड झाली असून तो जिल्हावासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.
हैदराबाद येथे होणार प्रशिक्षण
मुख्य परीक्षेत यश मिळाल्याने त्याची मेरीट यादीनुसार निवड झाली. त्याची हैदराबाद येथील नॅशनल अॅकेडमी आॅफ अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तो १ जानेवारीपासून कृषी खात्याच्या प्रशिक्षणासाठी रूजू होत आहे.
पालकांसाठी शिक्षणाचा संदेश
सरकारी शाळा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती प्रमाण वाढले आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद होत आहेत. जि.प. शाळांमधूनही मिळालेले शिक्षण जीवनात यशस्वी बनविते, असाच संदेश अभिषेकच्या यशाने पालकांना दिला आहे.