बंधारा फोडल्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 12:20 AM2017-06-16T00:20:22+5:302017-06-16T00:20:22+5:30
तालुक्यातील जेवणाळा मचारना नजीकच्या ईसापूर सरकारी नाल्यावर बंधारा फोडण्यात आल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासकीय मालमत्तेचे नुकसान : पालांदूर पोलिसांची टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील जेवणाळा मचारना नजीकच्या ईसापूर सरकारी नाल्यावर बंधारा फोडण्यात आल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी संकटात सापडले आहे. जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे.
तालुक्यातील जेवणाळा मचारना येथील ह.प.न ४ ईसापूर सरकारी नाल्यावर १९८२ ला बांधण्यात आला होता. त्यामुळे येथील पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच गायी, गुरे, जनावरांसाठी पिण्याकरिता होत होता. ग्रामपंचायतद्वारे या बंधाऱ्याचा लिलाव मच्छीपालन करण्यासाठी येत होता. येथील पाण्यावर मचारना, केसलवाडा, ईसापूर येथील जवळजवळ १०० शेतकरी धान्य शेताकरिता अवलंबून आहेत. तसेच शासनाद्वारे या बंधाऱ्याच्या रपट्यावर लोखंडी गेट (दरवाजा पाटी) ३० लाख रुपये खर्चून उभारण्यात आली होती. परंतु २८ मार्च २०१७ ला रात्री ११ वाजता वसंता डोमा ठवकर रा.मचारना यांनी रात्री जेसीबी लावून बंधारा तोडण्याचा प्रयत्न केला. यावर शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर १६ मे २०१७ रोजी बंधाऱ्याचे लोखंडी दरवाज्याचे पोल कापले. बंधारा फोडून त्या जागेवर त्याने बांध्या तयार केल्या आहेत. हे काम त्याने रात्रीच्या वेळी केले.
बंधारा तोडला गेल्यामुळे येथील पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी संकटात सापडले आहे. जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. येथील आसपासची शेती ही पूर्णत: या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेती करणे येथील शेतकऱ्यांना अडचणीत झाले आहे. त्यामुळे १०० शेतकऱ्याच्या दोनशे एकर शेतीला पावसाच्या पुरापासून होणारा धोका निर्माण होऊ शकतो, असे वर्तविले जात आहे. यावर ग्रामपंचायत मचारणा यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर शासकीय मालमतेचे नुकसान केल्याबाबद गुन्हा दाखल करून न्याय देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदनातून केली. निवेदनावर रविंद्र श्रीराम फंदे, दशरथ विठोबा कुथे, केवळराम काशीराम पर्वतकर, मीरा चित्ररंजन लांजेवार, श्यामराव सोमा झलके, सायात्रा सोमा कींनाळे, सरीता प्रकाश ढोके, तनिराम आसाराम घोनमोडे, श्रीराम तुळसीराम घोनमोडे, बाळा तुळशीराम घोनमोडे, नामदेव राजीराम लांजेवार, श्रावण मोतीराम कडव, तुलाराम बांते, नरेश ताराचंद फटे, अनमोल ईश्वर ढोके, संघराज धनराज गोस्वामी यांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे.