वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:41 PM2018-12-03T21:41:09+5:302018-12-03T21:41:35+5:30
चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.
साकोली तालुका सर्वबाजूने घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे या शेतशिवारात जंगली प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. रानडुक्कर, सांबर, निलगाय, हरीण आदी प्राणी बिनधास्त शेतशिवारात शिरतात. धानाच्या शेतातही मोठे नुकसार करतात. परिसरातील अनेक शेतकºयांनी ऊसाची लागवट केली आहे. या ऊसाच्या फडात रानडुक्करे मुक्तपणे संचार करताना दिसतात. अनेकदा हिंसक झालेले रानडुक्कर शेतकºयांवर हल्लेही करतात. सध्या शेतशिवारात भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात उभे आहे. त्यावर तृणभक्षी प्राणी ताव मारताना दिसून येत आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान होते.
नवेगाव बांध आणि नागझिरा अभयारण्याशी साकोली तालुका जोडलेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. तालुक्यातील बाम्पेवाडा, उमरझरी, शिवनटोला, जांभळी, खांबा, पिटेझरी, वडेगाव, तुडमापुरी, पाथरी या गावात तर सर्वाधिक वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. जंगलातील जलस्त्रोत कमी झाले की, सहज मिळणाºया पाण्याच्या शोधात प्राण्यांचे कळप शेतात शिरतात. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. परंतु त्यालाही वन्यप्राणी जुमानत नाही. अनेक ठिकाणी शेतकºयांनी तार कुंपणात वीज प्रवाह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ठिकाणी हा अघोरी प्रयत्न शेतकºयांच्या अंगलट आला. त्यामुळे अनेक शेतकरी आता वनविभागाकडे धाव घेत आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी या वन्यप्राण्यांना शेतापासून दूर पिटाळण्यासाठी कधीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्यांचे लक्ष केवळ शिकारी आणि लाकुडतोड्यांवरच असते. परिणामी शेतकºयाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
जंगलात वाढली शिकार
साकोली तालुक्यातील घनदाट जंगलात विविध तृणभक्षी आणि हिस्त्र प्राणी आहेत. यातील तृणभक्षी प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहे. काही अट्टल शिकारी आपल्या कुत्र्यांच्या मदतीने प्राण्यांची शिकार करतात. कुत्रा या प्राण्यांचा पाठलाग करतो. त्यानंतर प्राणी दमला की शिकारी त्यावर हल्ला चढवितात. तर काही भागात जंगलातून गेलेल्या ३३ केव्ही वीज तारावंर आकोडे टाकून वन्यप्राण्यांना वीज प्रवाहाने मारतात. या प्राण्यांचे मांस गावांगावात विकले जाते.
महामार्गामुळे वाढले अपघात
साकोली तालुक्यातील जंगलातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो. या रस्त्यावर अहोरात्र भरधाव वाहने धावत असतात. अनेकदा भरदाव वाहनाखाली येवून वन्यप्राणी चिरडले जातात. अस्वल, बिबट, निलगाय, रानडुक्कर आदी प्राणी अपघातात मृत्युमुखी पडतात. वनविभाग केवळ पंचनामा करून आपली जबाबदारी झटकते.