शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:15 PM2018-03-12T23:15:33+5:302018-03-12T23:15:33+5:30
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.
चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.
अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया चिचाळ येथील भारत तलमले या शेतकऱ्याकडे चिचाळ व पाथरी शेतशिवारात असे एकूण तीन एकर शेती आहे. दरवर्षी निसर्गाची अवकृपा परिणामी उत्पादन कमी आले. लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यात प्रचंड तफावत असल्याने कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तलमले राहायचे.
त्यांच्यावर बँक आॅफ इंडिया कोंढा विविध कार्यकारी सोसायटी, पवनी तालुका सहकारी पत संस्था, गावातील महिला बचत गटाचे कर्ज यासह गावातील अन्य लोकांचे हात उसणवारीचे असे जवळपास तीन लक्ष रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सततच्या नापिकीमुळे ते नेहमी विवंचनेत असायचे. यामुळेच त्यांनी मृत्युला कवटाळले असावे, अशी माहिती मृतक भारत तलमले यांच्या पत्नीने लोकमतशी बोलताना दिली.
भारतने जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. त्यांना प्रथम अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील पडोळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तलमले यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडिल असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
घराचा कर्ता पुरूष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मृतकाची पत्नी मनिषा तलमले यांच्या खांद्यावर आली आहे. शासनाने तलमले यांचे कर्ज माफ करून सदर कुटुंबाला दोन लक्ष रूपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही चिचाळ ग्रामवासियांनी केली आहे.