कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: March 31, 2017 12:29 AM2017-03-31T00:29:40+5:302017-03-31T00:29:40+5:30
सानगडी येथील शेतकरी रमेश भिमदेव खर्डेकर (५३) या शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे आणि मे महिन्यात असलेल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करावा
ंसानगडी : सानगडी येथील शेतकरी रमेश भिमदेव खर्डेकर (५३) या शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे आणि मे महिन्यात असलेल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करावा या विवंचनेत विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सानगडी येथे घडली.
त्यांना शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. गावातील सेवा सहकारी संस्थेचे, नातेवाईकांचे व मित्रांचे कर्ज होते. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडायचे असताना दुसऱ्या मुलीचे लग्न ९ मे रोजी ठरले आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसा कोठून आणायचा या विवंचनेत ते होते. दरम्यान, मंगळवारला रात्री कुटुंबियांचे जेवण आटोपल्यानंतर रमेशने विष प्राशन केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच सानगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान निधन झाले. मृतक शेतकरी रमेश खर्डेकर यांच्यामागे दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. त्यांचेकडे दीड एकर शेती आहे. (वार्ताहर)