विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: November 3, 2016 12:39 AM2016-11-03T00:39:43+5:302016-11-03T00:39:43+5:30
तालुक्यातील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.
किन्ही येथील घटना : चार लाख रूपयांचे होते कर्ज
लाखांदूर : तालुक्यातील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार ) येथे घडली. दिलीप मारोती चिरवतकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार ) येथील दिलीप चिरवतकर या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती असून दरवर्षी सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने दिलीपवर कर्जाची रक्कम वाढली होती. मागील काही वषार्पासून बँक, बचतगट आणि खासगी सावकाराकडून चार लाख रूपयाच्या वर कर्ज आहे.
कर्ज काढून शेती केली मात्र नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे ते नेहमी तणावात राहत होते. मंगळवारला दुपारी सरांडी (बुज) रस्त्यावरील आपल्या शेतात जावून शेतातील धान पिकाची अवस्था बघून ते अधिकच हतबल झाले. दरम्यान, शेतात असलेल्या किटकनाशक प्राशन केल्याने ते जागेवरच पडून राहिले.
ही घटना शेताजवळील चिरवतकर यांच्या शेताला लागून असलेल्या ईश्वर शहारे यांच्या लक्षात आल्यानंतर शहारेनी गावातील विनायक तरारे यांना दिलीप शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच चिरवतकर कुटुंबियांनी लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. भंडारा येथून नागपूरला नेण्यात आले. नागपुरात उपचारादरम्यान बुधवारला दुपारी दिलीपचा मृत्यू झाला.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)