कोंढा येथे उपबाजारात शेतकऱ्यांचे उन्हाळी धान उघड्यावर
By admin | Published: June 6, 2017 12:23 AM2017-06-06T00:23:27+5:302017-06-06T00:23:27+5:30
चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे.
मालाची प्रचंड हानी : गोडाऊन उभारण्याची मागणी, राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा कोसरा : चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे. ते विकण्यासाठी शेतकरी कोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपयार्डमध्ये नेत आहे. पण तेथे शेतकऱ्यांसाठी गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ठेवावे लागत आहे.
कोंढा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नाही. पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून कोंढा परिसर आहे. या परिसरात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पण खरीप हंगामात घेतलेल्या धानासाठी व उन्हाळी धानासाठी आधारभूत केंद्र नाही. ही एक कोंढा परिसरासाठी शोकांतिका आहे. कोंढा येथे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. पण शासकीय आधारभूत केंद्र दोन वर्षापासून नाही. त्यामुळे सर्वांना चकारा (अड्याळ) येथे धान विकण्यासाठी न्यावे लागते. कोंढा येथे अनेक राईस मिल आहेत. तिथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होऊ शकते. पण एकाही पुढाऱ्याची इच्छाशक्ती नाही. म्हणून शेतकऱ्यांना नाईलाजाने उपबाजार, कोंढा येथे तसेच व्यापाऱ्यांना धान विकावे लागते. शेतकरी अकाली पाऊस तसेच अनेक अस्मानी तर दुसरीकडे सुलताने माऱ्यामुळे मेटाकुटीला आला आहे. उन्हाळी धान पाण्याची सुविधा असणाऱ्यांनी अत्यल्प प्रमाणात पीक घेतले. कारण चौरास भागात पाण्याची पातळी खोल गेली असून सतत विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पाण्याअभावी गेले आहे. अशा अवस्थेत अत्यल्प प्रमाणात उन्हाळी धान पीक निघाले तर त्याला सुरक्षीत ठेवण्याची सुविधा नाही. आधारभूत केंद्र कोंढा येथे नसल्याने शेतकऱ्यांनी आपले धान उपबाजार कोंढा येथे विकण्यासाठी आणले आहेत. सध्या उपबाजार कोंढा येथे उघड्यावर धान ठेवले आहे. पाऊस पडण्याचे दिवस असल्याने केव्हाही पाऊस पडल्यास उन्हाळी धान पिकांची नासाडी होऊ शकते. तेव्हा उपबाजार कोंढा येथे धान्य ठेवण्यासाठी गोडाऊनची गरज आहे.
कोंढा उपबाजारात मालाची आवक
कृषी उत्पन्न बाजार समिती, पवनी अंतर्गत कोंढा येथे उपबाजार सुरु करण्यात आले. येथे वर्षभर सर्व खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात आवक असते. पवनी तालुक्यातील सर्वात जास्त माल कोंढा येथे उपबाजारात येते. पण माल गोडाऊन नसल्याने उघड्यावर पडून असते.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर असल्याने चोरी होते. तसेच अचानक पाऊस पडल्यास मालाची प्रचंड हानी होते. तरी उपबाजार येथे शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण मिळावे यासाठी गोडाऊची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळी धान उघड्यावर पडले असून पावसाळा सुरु होणार आहे. तेव्हा धानाची नासाडी होण्याची मोठी शक्यता तेव्हा कोंढा येथील उपबाजार येथे गोडाऊन उभारण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.