निलज-कारधा राष्ट्रीय महामार्गाच्या उंचीमुळे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:20+5:302021-06-10T04:24:20+5:30
पवनी : निलज-कारधा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पूर्वीपेक्षा महामार्गाची उंची फार जास्त वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूला ...
पवनी : निलज-कारधा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पूर्वीपेक्षा महामार्गाची उंची फार जास्त वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूला असलेले खेडेगाव आणि शेती महामार्गाच्या तुलनेत खूप खाली आहे. त्यामुळे गावात जाणारे रस्ते व शेतीवर जाणारे पांदण रस्ते खूप खाली आहेत. पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचून गावात व शेतावर जाणाऱ्या रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना अडचणीचे ठरणार आहे.
पवनी ते निलज मार्गावर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी तहसीलदार नीलिमा रंगारी यांना निवेदन देऊन महामार्गाची उंची वाढविण्यात आल्याने माती-मुरूम टाकून रस्ते बनविले; पण त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पांदण रस्त्यावर पाइप टाकण्यात आले नाही तसेच रस्त्याचे दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. परिणामी पांदण रस्त्यावर व शेतशिवारात पाणी साचून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शेतातील पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. गावखेड्यातील पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने गावात पाणी साचून राहण्याची शक्यता आहे.
रस्त्याचे दुतर्फा नालीचे बांधकाम करावे किंवा पांदण रस्ता पाइप टाकून तयार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार पवनी यांना निवेदन देताना जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विकास राऊत, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहरराव उरकूडकर, खरेदी-विक्री संस्था पवनीचे अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर, न.प. पवनीचे उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, अरविंद काकडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.