शेतकऱ्यांचा भाजीपाला आता थेट ग्राहकांच्या दारापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:26+5:302021-04-30T04:44:26+5:30
भंडारा : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनेच्या अंतर्गत (आत्मा) मानव विकास कार्यक्रमांतर्गत भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात शेतकरी ...
भंडारा : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनेच्या अंतर्गत (आत्मा) मानव विकास कार्यक्रमांतर्गत भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
मानव विकास कार्यक्रम निधी अंतर्गत सिव्हील लाईन परिसरात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रासाठी दहा गाळे बांधण्यात आले आहेत. गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोना काळात ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला, धान्य पुरवण्यासाठी विक्री केंद्र सुरू केले आहे. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, उपसंचालक बलसाने, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, मंडल अधिकारी विजय हुमणे, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने, गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव नीलेश गाढवे, अध्यक्ष संजय एकापुरे, सुरगंगा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अजितकुमार गजभिये यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत शेतकरी शेतीमाल उत्पादक कंपनीच्या सभासदांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव तर मिळणारच आहे याशिवाय ग्राहकांनाही ताजा, स्वच्छ, दर्जेदार विषमुक्त भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, दूध, पोहे, मुरमुरे, तांदूळ, ब्लॅक राईस, रेड राईस ग्राहकांच्या थेट दारापर्यंत पोहोचवून ग्राहकांचा कोरोना काळातील होणारा त्रास व गर्दी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवाय संचारबंदी काळात भाजीपाला फळांचा कुठेही तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.
भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत प्रक्रिया उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी दालने सुरू करण्यासाठी आयुक्त धीरजकुमार यांच्या सूचनांनुसार कोरोना काळात जिल्ह्यातील ग्राहकांना विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी हे विक्री केंद्र भंडारा शहरवासीयांसाठी लाखमोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी या अभियानांतर्गत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध शेतकरी गटांसाठी शेतमाल विक्रीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच ग्राहक आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी फळे, भाजीपाला, इतर शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी, ग्रेडिंग, पॅकिंग, विक्री व्यवस्थापनाचे चांगले कौशल्य शेतकऱ्यांना अवगत असल्याने दर्जेदार शेतमाल ग्राहकांना मिळणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी केले तर भंडारा मंडल अधिकारी विजय हुमणे यांनी आभार मानले.
बॉक्स
सेंद्रिय भाजीपाल्यासह देशी गाईचे दूधही मिळणार
संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हा आत्मा यंत्रणेच्यावतीने उभारण्यात आलेल्या शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्रातून ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे यासोबतच दैनंदिन आहारात लागणारी मिरची पावडर, धने पावडर, हळद, मुरमुरे, पोहे, मसाला, गीर गायीचे दूध, अर्धा लीटर व एक लीटरचे पाऊच यासोबतच तूप, लिंबू, चिकू, धने यासोबतच सर्व ताजा भाजीपाला ग्राहकांना नाममात्र दहा रुपयांच्या डिलिव्हरी चार्जमध्ये पुरविला जाणार आहे. गो कोरोना गो अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे ग्राहकांनी एक दिवस आधी मागणी केल्यास दुसर्या दिवशी ग्राहकांनी सांगितलेल्या पत्त्यावर थेट भाजीपाला पोहोचवला जाणार असल्याची माहिती शेतकरी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.