शेतकरी खरीप पीक कर्ज वाटपाच्या प्रतीक्षेत बँकांची उदासीनता कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:35 AM2021-05-10T04:35:52+5:302021-05-10T04:35:52+5:30
भंडारा : खरीप हंगामाची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून कृषी विभागाने २०२१ च्या खरीप हंगामासाठी शेतकरी मार्गदर्शन सभा ...
भंडारा : खरीप हंगामाची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून कृषी विभागाने २०२१ च्या खरीप हंगामासाठी शेतकरी मार्गदर्शन सभा व खरिपाच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे शेतीचा हंगाम जवळ आला असतानाही खरीप पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांचे बँकेत हेलपाटे सुरू असून बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत जात आहेत. मात्र बँकेत कर्मचारी संख्येचा अभाव तर काही बँकांमध्ये विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे. एकीकडे बळीराजाने पेरणीची तसेच मशागतीचे काम सुरू केले आहेत.
यावर्षी असलेले कोरोनाचे तीव्र संकट संकट तर दुसरीकडे निसर्गाचा बसलेला फटका अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीं कर्ज देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी बँकांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत पीक कर्ज देण्याबाबत सूचना दिल्या असल्या तरीही अनेक बँकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असताना दिसून येत आहे. ही वस्तुस्थिती आहे तर दुसरीकडे अनेक शेतकरी पीक कर्जासाठी गेल्यानंतरही कोरोनाच्या नावाखाली साहेब आज नाहीत, आज त्या टेबलचे अधिकारी नाहीत तर काही ठिकाणी सध्या कोरोनामुळे कामे बंद आहेत, तुम्ही नंतर या, अशी विविध कारणे सांगून वेळ मारून नेली जात आहे. याबाबत तक्रार नेमकी करायची तरी कुठे, अशी शेतकऱ्यांना पंचायत पडत आहे. तर दुसरीकडे त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांनी आपल्या परिसरातील बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी बँक व्यवस्थापकांचीही बैठक बोलावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाला पीक कर्जाचे टार्गेट दिले असूनही दरवर्षीच राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्जासाठी आखडता हात घेतात. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, धानपीक तसेच पुराच्या पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे आगामी खरीप हंगामात तरी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बळीराजा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने तयारीला लागला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना गतवर्षी अपेक्षित उत्पन्न झाले नसल्याने अनेक जणांना पीक कर्ज परत करता आलेले नाही. त्यांना पुन्हा एकदा नव्याने कर्ज मंजूर करण्याची गरज आहे. एकीकडे शासन बँकांना शेतकऱ्यांची कुठेही अडवणूक होणार नाही, यासाठी दररोज एक नवीन पत्र काढत आहे. तर दुसरीकडे बँका मात्र शासनाच्या या पत्राला केराची टोपली दाखवत आहेत. यासोबतच पीक कर्ज नेमके का मिळणार नाही, याची विचारणा केल्यास बँक अधिकारी नेमके कारण सांगत नाहीत. दुसरीकडे शासकीय कामात अडथळा करत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही काही बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून केले जात आहेत ही गंभीर बाब असून संकटात असलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील विविध बँकांनी आतापर्यत किती पीक कर्ज वितरित केले याबाबत जिल्हा प्रशासनाने थेट जाब विचारण्याची गरज आहे. तरच बँका पीककर्ज देतील अन्यथा शेतकऱ्यांना कर्जासाठी सुरू असलेला संघर्षच कोरोनासाठी कारणीभूत ठरू शकतो.
बॉक्स
साहेब आज आलेच नाहीत...
जिल्ह्यात असलेल्या अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा या ग्रामीण भागात कमी.............. आहेत. त्यामुळे तेथे खातेदारांची संख्याही जास्त.................. आहे. एकीकडे खातेदारांची संख्या जास्त असली तरी दुसरीकडे मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेत कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी राहत आहे. त्यामुळे अनेकदा शेतकरी बँकेत पीक कर्जासाठी विचारणा करण्यासाठी जात आहेत. मात्र त्यांना आज साहेब आले नाहीत, तुम्ही आठ दिवसांनी या अशी उत्तरे दिली जात आहेत. हा प्रकार जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी तालुक्यांमध्ये जास्त प्रमाणात सुरू आहे.
कोट
शेतकऱ्यांना गतवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे अनेकांना पीक कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्ज वितरित करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे तरच बँका शेतकऱ्यांना न्याय देतील.
संजय आकरे, उपसरपंच, खरबी नाका
कोट
कोरोनामुळे बँकेत कर्मचाऱ्यांची उपस्थितीत कमी राहत आहे. त्यामुळे बँकांनी सोलापूर जिल्ह्याचा आदर्श राबवावा. सोलापूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली आहे. शेतकरी घरी बसून पीक कर्जाचा लाभ घेऊ शकतात.
तानाजी गायधने, कृषिभूषण पूरस्कारप्राप्त सेंद्रिय उत्पादक शेतकरी, चिखली.