शेतकऱ्यांना या वर्षीही मिळणार बांधावरच खते बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:38 AM2021-04-28T04:38:17+5:302021-04-28T04:38:17+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारी मध्ये शेतकरी ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारी मध्ये शेतकरी व्यस्त असून, शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीसाठी कुठेही गर्दी न करता, गावातील शेतकरी गटामार्फतच खते व बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सहकार्याने कृषी निविष्ठा पोहोचण्यासाठी कृषी विभागातर्फे कृषिसेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये समन्वय ठेवून कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामपातळीवर समन्वयातून गतवर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पुरवली जाणार आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर बियाणे, खते शेतकरी गटामार्फत नोंदणी करून अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करावे, कृषी केंद्रावर गटाचा एकच प्रतिनिधी पाठवून एकूण मालाची मागणी नोंदवावी, दुकानात गर्दी करू नये, बियाणे खते खरेदीसाठी गावातील कोणत्याही एका गटात शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, गटामध्ये अद्याप नोंदणी केलेले नसल्यास, या वर्षी निविष्ठा खरेदीसाठी कमीतकमी पाच शेतकऱ्यांचा मिळून आत्मा अंतर्गत गट तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते कीटकनाशके खरेदी केल्यानंतर अधिकृत पावती जपून ठेवावी, खते खरेदी करताना पक्क्या बिलांसह, पॉस मशीनच्याच बिलाचा दुकानदारास आग्रह करावा. पिशवीवरील प्रिंटेड किमतीपेक्षा जास्त किंमत देऊ नये, खरे खरेदी किंमत असलेल्या बियाणे, खते पिशवीवरील मजकूर, लॉटनंबर बिलावर बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बियाणे पेरणी करताना, बियाण्याच्या पिशवीचा खालचा भाग फोडून बियाणे काढावे, जेणेकरून पिशवीला लावलेले लेबल जसेच्या तसे कायम राहतील, बियाणे वापरताना कमीतकमी अर्धा किलो एक किलो बियाणे पिशवीसह हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. लागवडीनंतर बियाणे उगवण क्षमता, बियाणे भेसळ आदी कोणतीही तक्रार आल्यास, त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविता येईल. बियाणे, खते कीटकनाशके बाबतची कोणतीही तक्रार शेतकऱ्यांना आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी. मात्र, खरीप हंगामातील खते, बियाणे खरेदीसाठी शासनाने दिलेल्या ‘ब्रेक द चैन’ निर्देशांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.
कोट
शेतकऱ्यांची खरीप हंगामात कुठेही गैरसोय होणार नाही, यासाठी गटामार्फत एकत्रित बियाणे खरेदी करावे. शेतकऱ्यांनी एकत्रित मागणी करून परवानाधारक कृषिसेवा केंद्रामार्फतच बांधावर खते बियाणे पोहोच होण्यासाठी आपली मागणी गटामार्फत कृषी केंद्रांकडे नोंदवावी.
हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक भंडारा.
बॉक्स
शेतकऱ्यांनो, या गोष्टी अवश्य करा
शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना कुठेही गर्दी करू नये. गटामार्फत खरेदी करावे. यासोबतच दुकानदारांकडे पक्क्या बिलांचा आग्रह धरावा. काही बियाणे पेरणीपूर्वी राखून पिशवीसह जपून ठेवावे. प्रत्येक गावांमध्ये पाच जणांनी एकत्र येऊन गट तयार करावा. जे पूर्वीचे जुने शेतकरी गट आहेत. त्यांना गटामार्फत खते, बियाणे, बियाणे खरेदीची प्रक्रिया माहीत आहे. शेतकऱ्यांनी शासन निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भंडाराचे प्रदीप म्हसकर यांनी केले आहे.