कर्जमुक्तीपासून शेतकरी वंचित राहणार
By admin | Published: July 2, 2017 12:20 AM2017-07-02T00:20:55+5:302017-07-02T00:20:55+5:30
शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे.
त्रुटीचा फटका बसणार : पश्चिम महाराष्ट्राला अधिक फायदा
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नसल्याची माहिती आहे. उलट पश्चिम महाराष्ट्रात ३० जून ही कर्ज परतफेड करण्याची तारीख असल्याने त्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था व व्यापारी बँकेकडून कर्ज घेतो. सन २०१६ मध्ये एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते. ३० मार्च २०१७ मध्ये ते भरण्याची मुदत होती. मुदतीनंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली.
भंडारा जिल्ह्यासह गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून नगदी पीक म्हणून ऊस लागवड करण्यात येते. वित्तीय वर्ष मार्चनंतर एप्रिल महिन्यात येथील शेतकरी कर्ज काढतो. विशेषत: भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तथा सोसायटी, पतसंस्था कडून कर्ज काढतो. राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. एप्रिल २०१६ मध्ये काढलेला पीक कर्ज मार्च २०१७ मध्ये भरावयाचा होता. मार्च महिन्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे मार्चनंतर कर्ज माफी मिळणार नाही असा फतवा सहकार विभागाने काढला आहे. या बँकानी व सोसायट्यांनी कर्जमाफी करण्यात नकार दिला आहे. जिल्ह्यातील शेतकरी यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्रात ३० जून कर्ज परतफेड करण्याची तारीख आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तारीख ३० जून आहे. कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष व्याप्त आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची परतफेड येथे शेतकऱ्यांना करावी लागणार काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
शेतकरी कर्जमाफीची माहिती जाणून घेतली. अभ्यासाअंती भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही अटींमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडे आपण यासंदर्भात पाठपुरावा करून पावसाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरणार आहे.
- चरण वाघमारे, आमदार तुमसर
सहकार विभागाने जिल्हा बँका व सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आदेश देण्याची मागणी आ. चरण वाघमारे यांचेकडे केली आहे. भंडारा जिल्हा धान व ऊस उत्पादक जिल्हा असून येथील शेतकरी जिल्हा बँकाकडूनच कर्ज घेतात. कर्जमाफीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळावा.
- हिरालाल नागपूरे, गटनेते पं.स. तुमसर.