उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे होणार दहा कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:43+5:302021-05-18T04:36:43+5:30
रब्बी हंगामाअंतर्गत तालुक्यात लागवडीखालील उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणीला प्रारंभ झाला आहे. मात्र धानपिकाची मळणी होऊनदेखील तालुक्यात अद्याप शासकीय ...
रब्बी हंगामाअंतर्गत तालुक्यात लागवडीखालील उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणीला प्रारंभ झाला आहे. मात्र धानपिकाची मळणी होऊनदेखील तालुक्यात अद्याप शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न करण्यात आल्याने शेतकऱ्यांना उत्पादित धानाची विक्री खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना करावी लागत आहे. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांद्वारा १३५० प्रति क्विंटल दराने धानाची खरेदी केली जात आहे. धानाला शासकीय दर १८६८ रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांचे जवळपास ५०० रुपये प्रति क्विंटल नुकसान होत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे जवळपास दहा कोटी रुपयांचे नुकसान होण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
बॉक्स
उचल देश व भरडाईस गती देणे आवश्यक
गत खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाला उचल आदेश मिळाल्याची माहिती आहे. त्यानुसार तालुक्यातील आधारभूत केंद्राअंतर्गत धानाची उचल केली जाईल. मात्र खरिपातील केंद्राअंतर्गत खरेदी केलेले अर्ध्याहून अधिक धानपोती उघड्यावर आहेत. त्यामुळे उचल आदेशानुसार सर्वप्रथम उघड्यावरील धान उचल करून भराई केली जाणार, तर मग गोदामे केव्हा खाली होणार? अशी भीती आहे. उचल आदेश व भरडाईस गती देणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
कोट
शेतकऱ्यांच्या हितासाठी धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे. कोरोनाने तालुक्यातील शेतकरी संकटात आहे. खरिपातील धानाची अद्याप उचल न केल्याने उन्हाळी धान खरेदी सुरू होण्याची शंका आहे. दुसरीकडे सरकारी भावाच्या तुलनेत ५०० रुपये प्रति क्विंटल कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याने आणखी संकट वाढणार आहे.
मनोहर राऊत,
माजी जि. प. सदस्य