शेततळ्यांची कामे फक्त १२ टक्के
By Admin | Published: March 10, 2017 01:27 AM2017-03-10T01:27:41+5:302017-03-10T01:27:41+5:30
मागेल त्याला शेततळे अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेत जिल्ह्यात फक्त १२ टक्केच शेततळ्यांची बांधणी झालेली आहे.
४० लक्ष रूपयांचा खर्च : पिचिंग व फलकाची कामे अर्धवट
इंद्रपाल कटकवार भंडारा
मागेल त्याला शेततळे अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेत जिल्ह्यात फक्त १२ टक्केच शेततळ्यांची बांधणी झालेली आहे. विशेष म्हणजे यावर ४० लक्ष ७७ हजार रुपयांचा खर्च झाला असून २०० कामे प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील सिंचन सुविधांची स्थिती पाहता यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत मागेल त्याला शेततळे ही योजना राबविली जाते. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय ते तालुका कृषी कार्यालयापर्यंत या योजनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांपर्यंत किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
याकरिता हजारो रुपयांचा निधी खर्च होत असला तरी ग्रामीण भागात विशेषत: शेततळ्यांच्या योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये उदासिनता दिसून येते.
जिल्ह्यातील सातही तालुके मिळून १२०० शेततळी बांधण्याचा लक्षांक देण्यात आला आहे. यात कालावधी जास्त असला तरी अर्ज संख्या १४४७ अशी होती. यापैकी पात्र अर्जांची संख्या १३३१ एवढी होती. निकषानुसार १२७८ शेतकरी पात्र ठरली. परंतु तांत्रिक दृष्ट्या १०८८ शेतकऱ्यांना ही योजना पात्र ठरविण्यात आली.
पात्र ठरलेल्या शेततळ्यांच्या बांधकामांतर्गत ९०३ शेततळ्यांच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी आखणी करुन ८५६ शेततळ्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला होता. यापैकी २०० शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर असून १०४ कामे पूर्ण झाली आहेत. शेततळी पूर्ण झालेल्या व अनुदान दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या ८८ इतकी आहे. भंडारा तालुक्यात ६, मोहाडी २२, तुमसर ६, पवनी ३, साकोली २०, लाखनी ४५ तर लाखांदूर तालुक्यात २ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. या कामासाठी ४० लक्ष ७७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.