धानाचे चुकारे अडल्याने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:25+5:302021-08-20T04:41:25+5:30
शेतकऱ्यांची उपजीविका शेतातील धानावर अवलंबून असते; परंतु धानाचा मोबदलाच वेळेवर न मिळाल्याने उपजीविका कशी चालेल. त्यांचे उन्हाळी धानाची चुकारे ...
शेतकऱ्यांची उपजीविका शेतातील धानावर अवलंबून असते; परंतु धानाचा मोबदलाच वेळेवर न मिळाल्याने उपजीविका कशी चालेल. त्यांचे उन्हाळी धानाची चुकारे गत दोन महिन्यांपासून अडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत उपजीविकेचा प्रश्न पडलेला असल्याने त्यांच्यात आर्थिक टंचाई भासलेली आहे. साकोली परिसरातील शेतकरी दररोज केंद्र संचालकांना चुकारे कधी मिळणार यासंदर्भात विचारणा करताना दिसून येतात. मागील वर्षांत खरिपाचे केंद्रावर धान विक्री केले गेले. परंतु अजूनही काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत खेचला जात आहे. रब्बीच्या हंगामात बोनसचे अर्धे पैसे मिळाले. परंतु ते पैसे कर्ज भरण्यातच गेल्याने शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे. खरीप हंगामातील धानाची रोवणी आटोपत आलेली आहे. परंतु उन्हाळी धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांवर उपजीविकेचा प्रश्न पडला आहे तसेच लागवडीचा खर्च व खताचे भाव वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरने हजाराचा आकडा ओलांडला आहे. ही सर्व महागाई त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे त्यांना ट्रॅक्टरचे भाडे देण्याकरिता कर्जच काढावे लागत आहे. धानाचे चुकारे लवकर जमा होईल, याकडे शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे.