पाच दिवसांपासून उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:19 AM2017-06-17T00:19:00+5:302017-06-17T00:19:00+5:30
तुमसर तालुक्यातील रुपेरा येथील निलंबित रोजगार सेवक बाबुलाल तुरकर यांनी शासन-प्रशासनाकडून न्याय मिळावा,...
उपोषण बेदखल : रोजगार सेवकाची न्यायाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यातील रुपेरा येथील निलंबित रोजगार सेवक बाबुलाल तुरकर यांनी शासन-प्रशासनाकडून न्याय मिळावा, यासाठी गत पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. मात्र अद्यापही प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.
याबाबत असे की, रुपेरा ग्रामपंचायतमध्ये बाबुलाल तुरकर हे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता बदल झाल्यानंतर नविन कार्यकारीणीने त्यांना रोजगार सेवक पदावरुन निलंबित केले. त्यामुळे त्यांचे थकित मानधन रखडले आहे. याविषयी त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनेकदा मागणी केली. त्यानंतरही मानधन देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप आहे. रुपेरा ग्रामपंचायतीचे सचिव युवराज गभणे, तुमसरचे खंडविकास अधिकारी, सरपंच उमा पटले, उपसरपंच राहुल भवसागर, विद्यमान ग्रामसेवक देवराव गायधने यांनी न्याय देण्यास टाळाटाळ केली.
न्याय मिळावा, यासाठी बाबुलाल तुरकर यांनी १२ जूनपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला. मात्र अद्यापही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळत आहेत. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.