मृत्यूनंतरही जोपासले रुग्णसेवेचे व्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 09:58 PM2017-09-24T21:58:45+5:302017-09-24T21:59:01+5:30
विरली बु. जिवंत असेपर्यंत एखादी सेवा, व्रत जोपासले जातात. मात्र, येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. गंगाधर बागडे यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेत घालविल्यानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मृत्युनंतरही रुग्णसेवेचे .....
विरली (बु.) : विरली बु. जिवंत असेपर्यंत एखादी सेवा, व्रत जोपासले जातात. मात्र, येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. गंगाधर बागडे यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेत घालविल्यानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मृत्युनंतरही रुग्णसेवेचे व्रत जोपासले. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या आई, वडील आणि कनिष्ठ बंधूनीही नेत्रदान केले होते.
येथील डॉ. गंगाधर बागडे (६७) यांचे आज शनिवारला सकाळी दीर्घ आजाराने देहावसान झाले. त्यांनी आपली प्रकृती साथ देत नसल्याचे पाहून स्थानिक ग्रामायण प्रतिष्इानमार्फत मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार पुत्र दिपक आणि मिलिंद यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान केले. नेत्रदानाची प्रक्रिया नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रपेढीतील नेत्रतज्ञांनी पार पाडली.
ते गावात एक सेवाभावी डॉक्टर म्हणून सुपरिचित होते. रात्रीबेरात्री कोणत्याही गोरगरिबांच्या हाकेला हाक देवून धावून जाणारे गरिबांचे डॉक्टर म्हणून ते ओळखले जायचे. अशा या डॉक्टरांनी आयुष्यभर रुग्णसेवेचे व्रत जोपासले आहे.
आता मृत्युनंतर दोन नेत्रबाधितांना त्यांच्या नेत्रांची सेवा मिळणार आहे. ते गावातील ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक चळवळी उभारल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.
विशेष उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी डॉ. बागडे यांच्या मातोश्री सरस्वता, वडिल तुकाराम बागडे आणि कनिष्ठ बंधू व्यंकट बागडे यांनीही मरणोत्तर नेत्रदान केले होते. त्यामुळे डॉ. बागडे यांनी नेत्रदान करून आपल्या कुटूंबाचा वारसा पुढे चालविला आहे.