कुंभली पुलावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:50 PM2018-07-10T22:50:26+5:302018-07-10T22:50:44+5:30
जवळील कुंभली येथे चुलबंद नदीवर असलेल्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाड येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जवळील कुंभली येथे चुलबंद नदीवर असलेल्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाड येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.
साकोली ते हैद्राबाद ला जाणारा हा राज्य मार्ग असून या पुलावरून दररोज हजारो वाहने ये जा करतात. या पुलावर मागील कित्येक दिवसापासून मोठे खड्डे पडले आहेत. या संदर्भात अनेकांनी बऱ्याचदा तक्रारी केल्या मात्र या तक्रारीकडे बांधकाम विभागाने कानाडोळा केला आहे. या पुलावरील खड्ड्यांमुळे पुलावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे पुलावर पाणी साचले राहते. त्यामुळे कुठून वाहन काढावे असा प्रश्न निर्माण होतो. कुंभली येथील हा पुल बराच जुना असून या पुलाच्या दुरुस्तीकडे शासनातर्फे लक्षच दिले जात नाही. यापूर्वी या पुलावर बॅरीकेटस् नसल्याने बरेच अपघात घडून अनेकांना नदीत पडून आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस या पुलाची अवस्था दयनीय होत चालली आहे. महाड येथे पुल खचून अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती साकोली तालुक्यात तर होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे.