बाप रे ! एकाच दिवशी 24 पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:13+5:30
गत सहा महिन्यांनंतर २ जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. १ जानेवारीला निरंक असलेल्या भंडारा जिल्ह्यात २ जानेवारी रोजी चार रुग्ण आढळून आले. ३ जानेवारी रोजी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच नऊ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यातील आठ जण एकट्या भंडारा शहरातील होते. ४ जानेवारी रोजी सहा, ५ जानेवारी रोजी ११ आणि गुरुवार ६ जानेवारी रोजी तब्बल २४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात अवघ्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ५६ वर पोहोचली असून, गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १२ व्यक्ती एकट्या भंडारा शहरातील आहेत. तिसऱ्या लाटेची ही सूचना असून नागरिकांनी आता कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक झाले आहे.
गत सहा महिन्यांनंतर २ जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. १ जानेवारीला निरंक असलेल्या भंडारा जिल्ह्यात २ जानेवारी रोजी चार रुग्ण आढळून आले. ३ जानेवारी रोजी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच नऊ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यातील आठ जण एकट्या भंडारा शहरातील होते. ४ जानेवारी रोजी सहा, ५ जानेवारी रोजी ११ आणि गुरुवार ६ जानेवारी रोजी तब्बल २४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्यासह लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. गत आठवड्यापर्यंत नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेखही आता वाढायला लागला आहे.
गुरुवारी ९०७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर ३२८, तर ॲन्टीजन ५७९ व्यक्तींची करण्यात आली. आरटीपीसीआर चाचणी आठ जण तर ॲन्टीजन चाचणीत १६ जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोरोना रुग्णांसाठी वाॅर्ड तयार करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता यावेळी प्रशासनाने सुरुवातीपासूनच उपाययोजना केल्या आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णालय हाऊसफुल्ल झाली होती. औषधांचा तुटवडाही निर्माण झाला होता. इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता. ही बाब लक्षात घेत उपाययोजना केल्या आहेत.
भंडारा शहर ठरतेय हाॅटस्पाॅट
- जिल्हा मुख्यालय असलेले भंडारा शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हाॅटस्पाॅट ठरले होते. सर्वाधिक कोरोना रुग्ण याच तालुक्यात आढळले होते. आतासुद्धा भंडारा तालुक्यात गत सहा दिवसांत ३४ रुग्ण आढळून आले आहेत. परराज्यासह बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यात असलेल्या एकूण संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण शहरात आहेत.
चाचणी करण्याचे आवाहन
- जिल्ह्यात परराज्यासह बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. मात्र, ही मंडळी कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.