वडिलांचा मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला; नातवाची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 05:36 PM2022-10-27T17:36:41+5:302022-10-27T18:15:40+5:30
उमरवाडाची घटना, आरोपी वडिलांस अटक
भंडारा : घर खाली करण्याच्या वादात वडिलांनी मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे बुधवारी सायंकाळी घडली. तर मुलानेही वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही तक्रारींवरून तुमसर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हल्लेखोर वडिलांना अटक केली आहे.
भोजराज परमानंद मेश्राम (४३, रा. उमरवाडा) असे जखमीचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परमानंद सखाराम मेश्राम (६०) असे आरोपीचे नाव असून, त्याला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे. परमानंद मेश्राम आणि मुलगा भोजराज मेश्राम एकाच घरात राहतात. त्यांच्यात घर खाली करण्यावरून वाद सुरू होता. बुधवारी ‘माझ्या मालकीच्या घरात राहता. त्यामुळे मला उपरती राहावे लागते,’ असे परमानंदने आपल्या सुनेला म्हटले. तसेच शिवीगाळ केली. त्यावेळी भोजराजने शिवीगाळ कशाला करता? असे हटकले असता वडील परमानंदने घरातून चाकू आणून भोजराजवर हल्ला केला. त्यात त्याच्या छातीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तुमसर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोजराजचा मुलगा रवींद्र मेश्राम याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडील परमानंद मेश्राम यांच्याविरुद्ध भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांनी दिली मुलाविरुद्ध तक्रार
तर याच प्रकरणात वडील परमानंद सखाराम मेश्राम यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीत मुलगा भोजराज व सून मंगला या दोघांनी काठीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यावरून भोजराज मेश्राम व मंगला मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभरे व हवालदार खराबे करीत आहेत.